गेल्या महिन्याभरात झालेली अतिवृष्टी आणि कृष्णा, वारणा नद्यांना आलेल्या पुरामुळे सांगली जिल्ह्याच्या शिराळा, वाळवा, पलूस आणि मिरज तालुक्यातील चार हजार ७४.२७हेक्टर क्षेत्रातील पिके बाधित झाली आहेत.
या पिकांचे पंचनामे कृषी आणि महसूल विभागाने पूर्ण केली आहेत. या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी सात कोटी ४५ लाख रुपयांचा निधी लागणार आहे. या नुकसानीचा अहवाल सांगली जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे पाठविला असून निधीही मागणी केली आहे.
सांगली जिल्ह्यात मे २०२५ पासून सतत पाऊस सुरू आहे. जूनमध्ये अखंडित १५ दिवस पाऊस चालू झाल्यामुळे खरीप पेरण्या करण्यातही अडचणी आल्या होत्या. तरीही उघडीप मिळालेल्या कालावधीत शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या. ऑगस्ट महिन्यात संततधार पाऊस सुरू झाल्यामुळे वारणा आणि कोयना धरणातून विसर्ग सुरू केला. म्हणूनच कृष्णा आणि वारणा नद्यांना मागील आठवड्यात पूर आला.
या पुराचे पाणी जवळपास आठ ते दहा दिवस पिकात थांबले होते. यातूनच भात, सोयाबीन, भुईमूग, ऊस, केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. महसूल आणि कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यातील पलूस, शिराळा, वाळवा आणि मिरज तालुक्यांतील १३ हजार ४७५ शेतकऱ्यांचे चार हजार ७४.२७हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
या पिकांचे पंचनामे कृषी आणि महसूल विभागाने पूर्ण केले आहेत. या भरपाईसाठी सात कोटी ४५ लाख ३७ हजार ९०० रुपये निधीची गरज आहे. नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठविला असून भरपाईसाठी निधीची मागणी केली आहे.
तालुकानिहाय पिकांचे नुकसान
तालुका | बाधित शेतकरी | क्षेत्र (हेक्टरमध्ये) | अपेक्षित निधी |
मिरज | २९१२ | १५८०.३२ | २.६८ कोटी |
वाळवा | ३१३३ | ५५६.६२ | १.०७ कोटी |
शिराळा | ३३६० | ८४७.४६ | १.५३ कोटी |
पलूस | ४०७० | १०८९.८७ | २.१५ कोटी |
हेही वाचा : करटुल्यांची लागवड कशी करावी; बियाणं, कंद की कलम? जाणून घ्या सविस्तर करटुले लागवड तंत्र