केडगाव (जि. अहिल्यानगर) : नगर तालुक्यातील खारेकर्जुने परिसरात बिबट्याने मोठा धुमाकूळ घातला. त्यामुळे या परिसरातील नागरिक प्रचंड दहशतीखाली आहेत.
बिबट्याने एका चिमुकलीचा बळी घेतला, तर आठ वर्षीय मुलावर हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. त्यामुळे निंबळक पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आक्रमक होत गाव बंद, रास्ता रोको आंदोलन केले.
बिबट्याला जेरबंद करा अथवा ठार करण्याची मागणी नागरिकांनी केली होती. अखेर नरभक्षक बनलेल्या या बिबट्याला ठार मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
खारेकर्जुने वन परिक्षेत्रात बुधवारी (दि. १२) सायंकाळी रियांका सुनील पवार (वय ५) घराजवळ शेकोटीसमोर असताना बिबट्याने अचानक हल्ला करून तिला उचलून नेले. दुसऱ्या दिवशी (दि. १३) सकाळी झुडपात तिचा मृतदेह आढळून आला.
त्यानंतर शुक्रवारी (दि. १४) सायंकाळी खारे कर्जुनेपासून साधारण तीन किमी अंतरावरील इसळकमधील गेरंगे वस्तीवर राजवीर रामकिसन कोतकर (वय ८) याच्यावर बिबट्याने जीवघेणा हल्ला केला.
त्यात तो गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार चालू आहेत. दोन्ही घटना एकाच बिबट्याने केल्या असण्याची शक्यता आहे.
दरम्यान, बिबट्याच्या हल्ल्यामुळे शेतकरी, तसेच नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. शेतकरी शेतात कामे करण्यास घाबरत आहेत. शेतीच्या कामाचा खोळंबा होत आहे.
वन विभागाच्या वतीने परिसरातील नागरिकांनी आपल्या कुटुंबीयांची, तसेच पशुधनाची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वन विभागाच्या वतीने परिसरात जनजागृती करण्यात येत असून, वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी व विविध टीम बिबट्याचा शोध घेत आहेत.
३१ डिसेंबरपर्यंत मुदत
◼️ मानवासाठी हा बिबट्या धोकादायक ठरल्याने त्यास जेरबंद करण्यासाठी अथक प्रयत्न झाले. मात्र, त्याला यश आले नाही.
◼️ भविष्यात अधिक हानी होऊ नये, यासाठी या बिबट्याला ठार मारण्याची परवानगी देण्यात आली आहे.
◼️ हा आदेश ३१ डिसेंबरपर्यंत वैध राहील, असे मुख्य वन्यजीव रक्षकांनी आपल्या आदेशात नमूद केले आहे.
अधिक वाचा: उत्तर भारतात बर्फवृष्टी; उरलेल्या नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात कशी राहणार थंडी?
