कृषिप्रधान असलेल्या देशात वेळोवेळी शेतकऱ्यांची शासनाकडून थट्टा सुरू असते. वर्षभर आपल्या शेतात राबराब राबून मेहनतीने मिळविलेले कष्टाचे फळ अपेक्षित मिळत नाही.
त्यात बाजारात शेतमालाला योग्य भाव न मिळणे, बी-बियाणे, रासायनिक खते, औषधांचे अव्वाच्या सव्वा दर, शेतात काम करणाऱ्या मजुरांची वाणवा, जीवनावश्यक वस्तूंची वाढती महागाई, वेळोवेळी येणारे नैसर्गिक आपत्तीचे विघ्न, अशा अनेक असमानी संकटांचा सामना करतच २०२५ हे वर्ष केव्हा निघून गेले हे बळीराजाला कळलेच नाही.
येणाऱ्या वर्षात मात्र आमचे चांगले होईल आणि काळी आई भरभरून सुखसमृद्धी देईल याच आशेने शेतकरी पुन्हा पुन्हा शेतीच्या या रणांगणात कष्टाची लढाई लढायला सज्ज असतो.
वर्षभरात नऊ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
कर्ज, नापिकी, नैसर्गिक आपत्ती या कारणांमुळे नऊ शेतकऱ्यांनी आपल्या गळ्याभोवती आत्महत्येचा फास आवळून जगाचा निरोप घेतला. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांमध्ये रुस्तम खंडारे, गजानन भाकरे, प्रवीण राठोड, ज्ञानेश्वर घेगे, शंकर वानखडे, विलास दाते, अशोक शिंदे, लालसिंग राठोड, प्रेमसिंग जाधव या शेतकऱ्यांचा समावेश आहे. या घटनांमुळे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील सदस्य खचून गेले आहेत.
अवकाळी पावसाने पिकांचे अतोनात नुकसान
• सरते वर्ष शेतकऱ्यांसाठी नैसर्गिक आपत्तीमुळे आलेल्या संकटातच निघून गेल्याचे चित्र आजही डोळ्यांसमोर उभे राहते.
• १६ मे रोजी झालेल्या वादळी पावसाने अकोला जिल्ह्याच्या बार्शीटाकळी तालुक्यातील अनेक भागांत रब्बी व उन्हाळी पिकांचे अतोनात नुकसान झाले.
• २९ मे रोजी झालेल्या मान्सून पूर्व पावसाने काढणीला आलेल्या उन्हाळी तीळ, भुईमूग, कांदा, फळबागा, भाजीपाला आदी पिकांचे नुकसान झाले.
• मृग नक्षत्र कोरडे गेल्यानंतर २६ जून रोजी अतिवृष्टीसदृश पावसाने नुकतीच खरिपाची पेरणी झालेली पिके खरडून नेली.
• खरीप हंगामातील सोयाबीन व कापूस पिकांचे वेळोवेळी होणाऱ्या वातावरणातील बदलामुळे व पावसामुळे नुकसान झाल्याने उत्पादन घटले.
हेही वाचा : आता सर्पदंशावर होणार अचूक उपचार; स्नेक वेनम किटमुळे कळणार सर्पदंश विषारी की बिनविषारी
