सोलापूर : अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील सात लाख ६४ हजार शेतकऱ्यांसाठी ८६७ कोटी ३८ लाख रुपये मंजूर असले तरी आजपर्यंत एक लाख २२ हजार ४४० शेतकऱ्यांच्या खात्यावर १४० कोटी ७९ लाख ४० हजार रुपये जमा झाले आहेत.
उर्वरित शेतकऱ्यांची मंजूर रक्कम ज्यांच्याकडे फार्मर आयडी आहे त्यांना काहीही न करता खात्यावर रक्कम जमा होणार आहे, तर फार्मर आयडी नसलेल्या शेतकऱ्यांना व्हीके (विशिष्ट क्रमांक) नंबरवर केवायसी केल्यानंतर रक्कम जमा होईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मे, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात चार महिन्यात जिल्ह्यात पीक नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे.
ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पीक नुकसानभरपाई मंजूर झाली असली तरी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत नसल्याच्या तक्रारी गावागावातून आहेत.
रक्कम तर मंजूर आहे, मंजूर यादीत नावही आहे, यादीतील काही शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमाही झाली आहे, मात्र माझी रक्कम जमा होत नसल्याच्या तक्रारी शेतकरी करीत आहेत.
त्याचे उत्तर फार्मर आयडी काढला का?, काढला आहे असे उत्तर शेतकऱ्यांनी दिले तर पुढचा प्रश्न केवायसी केले आहे का?, केवायसी मागच्याच महिन्यात केलेलं, असे शेतकऱ्यांचे उत्तर असेल तर बघावे लागेल?, असे प्रकार गावोगावी सुरू आहेत.
याबाबत महसूल खात्याच्या संबंधित कर्मचाऱ्यांना विचारले असता फार्मर आयडी (शेतकरी ओळख प्रमाणपत्र) असेल तर शेतकऱ्यांनी काहीही करू नये, आपोआप पैसे जमा होतील.
शेतकऱ्यांना थांबावे लागणार
◼️ राज्यभरातील शेतकऱ्यांच्या याद्यांची टप्प्याटप्प्याने रक्कम थेट शासन बँक खात्यावर जमा करते. मंजूर यादीत नाव व रक्कम आहे, फार्मर आयडीही आहे, मात्र रक्कम खात्यावर जमा होण्यास वेळ लागते.
◼️ कारण शासनाने रक्कम खात्यावर जमा केल्यानंतरच बँक मेसेज देणार आहे. शासन रक्कम जमा करेपर्यंत शेतकऱ्यांना थांबावे लागणार आहे.
◼️ फार्मर आयडी काढला नसेल तर मंजूर रक्कम असलेल्या शेतकऱ्यांसाठी यादीत विशिष्ट नंबर येतो. त्या नंबरवर महा ई सेवा केंद्रात केवायसी केल्यानंतर मंजूर रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होते.
◼️ आतापर्यंत एक लाख २२ हजार ४४० शेतकऱ्यांच्या खात्यावर १४० कोटी ७९ लाख ४० हजार रुपये जमा झाले आहेत.
| अ. क्र. | तालुका | भरपाई न मिळालेल्या बाधित शेतकऱ्यांची संख्या | रक्कम (कोटी रुपये) |
|---|---|---|---|
| 1 | अक्कलकोट | 33,806 | 38.26 |
| 2 | बार्शी | 64,288 | 74.78 |
| 3 | करमाळा | 36,275 | 50.33 |
| 4 | माढा | 54,160 | 73.22 |
| 5 | माळशिरस | 35,471 | 36.33 |
| 6 | मंगळवेढा | 34,662 | 35.31 |
| 7 | मोहोळ | 23,272 | 27.23 |
| 8 | पंढरपूर | 40,146 | 41.54 |
| 9 | सांगोला | 51,056 | 67.65 |
| 10 | उत्तर सोलापूर | 3,816 | 4.86 |
| 11 | दक्षिण सोलापूर | 8,316 | 9.76 |
| 12 | अपर मंद्रुप | 13,849 | 16.44 |
सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी मुळे बाधित शेतकऱ्यांना मदतनिधी मंजूर असूनही ई केवायसी तसेच फार्मर आयडी नसल्यामुळे अद्याप नुकसान भरपाई जमा होईना.
अधिक वाचा: Montha Cyclone : मोंथा चक्रीवादळ राज्यात कुठे धडकणार? पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट
