अहिल्यानगर : नवीन सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्यासाठी राज्य सरकारने जामखेड तालुक्यात खर्डा, पाथर्डी, राहुरी तालुका खरेदी-विक्री संघ आणि श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण अशी चार हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यास मंजुरी दिली आहे.
यंदा प्रथमच शासनाने सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांना नॉमिनी (नामनिर्देशित) सुविधा उपलब्ध केली असून, नॉमिनी व्यक्तीला शेतकऱ्याच्या अनुपस्थितीत खरेदी केंद्रावर सोयाबीनची विक्री करता येणार आहे.
जिल्हा पणन संघाने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी सोयाबीन हमीभाव केंद्राचे २७ प्रस्ताव शासनाला सादर केले आहेत. यापैकी गतवर्षी सोयाबीन खरेदीचा अनुभव असलेल्या चार केंद्रांना नोंदणी करण्यास पहिल्या टप्प्यात मंजुरी देण्यात आली आहे.
सोयाबीन हमीभाव केंद्र सुरु करण्यास उशीर होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. शासनाने सोयाबीनचा हमीभाव ५ हजार ३२८ रुपये प्रति क्विंटल निश्चित केला आहे. खासगी बाजारात ३५०० ते ४१०० रुपयांपर्यंतच भाव मिळत आहे.
त्यामुळे हमीदराची शासकीय खरेदी केंद्रे सुरू होण्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना होती. ३ नोव्हेंबरपासून हमीदराने खरेदीसाठी नोंदणी सुरू केली आहे. हमीभाव खरेदी केंद्रांची तपासणी करण्यासाठी राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर दक्षता पथक असणार आहे.
हे पथक खरेदी केंद्राकडे आर्द्रता मोजण्यासाठीचे मीटर, चाळणी, इलेक्ट्रिक वजनकाटा, शेतकऱ्यांना पावती दिली जाते का? शेतकरी नोंदणी पॉस मशीनद्वारे केली आहे का? आदी बाबींवर लक्ष ठेवणार आहे.
मोबाईलद्वारे घरबसल्या नोंदणीची सुविधा
◼️ शेतकऱ्यांना सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी करताना आधारकार्ड, बँक पासबुक आणि सातबारा, आठ-अ उतारा आवश्यक आहे.
◼️ बँक खात्याला आधार आणि मोबाईल लिंक असणे बंधनकारक आहे.
◼️ नोंदणी करताना आणि विक्रीच्या वेळी शेतकऱ्यांना स्वतः उपस्थित राहून खरेदी केंद्रावर (बोटांचे ठसे) अनिवार्य करण्यात आले आहेत.
◼️ आजारी किंवा खरेदी केंद्रात येऊ न शकणाऱ्या शेतकऱ्यांना ई-समृद्धी अॅग्रो सेंटर अॅपद्वारे मोबाईलवरून नोंदणी करण्याची सुविधा देण्यात आली आहे.
चार केंद्रांतून जिल्ह्याची खरेदी कशी होणार?
◼️ खरीप हंगामात जिल्ह्यात दोन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली होती.
◼️ अवकाळी आणि अतिवृष्टीतून वाचलेल्या सोयाबीनची शेतकऱ्यांना खुल्या बाजारात अडीच ते चार हजार रुपये प्रति क्विंटल दराने विक्री करावी लागत आहे.
◼️ त्यामुळे हमीभाव केंद्र सुरू करण्याची मागणी केली जात होती. परंतु, शासनाने केवळ चारच केंद्रांना मंजुरी दिल्याने उर्वरित केंद्र सुरू होण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.
जिल्ह्यात चार ठिकाणी सोयाबीन नोंदणीला सुरुवात झाली आहे. शासनाच्या आदेशानुसार, उर्वरित केंद्र सुरू करण्यात येतील. शेतकऱ्यांनी स्वतः उपस्थित राहून सोयाबीनची नोंदणी करावी. अधिकाधिक शासकीय दरानुसार मालाची विक्री करावी. - भरत पाटील, जिल्हा पणन अधिकारी, अहिल्यानगर
अधिक वाचा: महसूल विभागाचे नवे आदेश, आता सात दिवसांत मिळणार शेतरस्ता; जाणून घ्या सविस्तर
