जालिंदर शिंदे
तेल बियांमध्ये करडईला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पूर्वी कवठेमहांकाळ तालुक्यातील ग्रामीण भागात जिरायत शेतीत करडई है अंतर्गत पीक घेतले जायचे. चार सरी ज्वारी तर एक सरी करडई अशा प्रकारे हे पीक पेरत असते; परंतु करडई लागवडीच्या क्षेत्रात दिवसेंदिवस घट होत आज ते पीक हद्दपारच झाले आहे.
त्यामुळे करडई तेलाशी निगडित असणाऱ्या अनेक लहान उद्योगांना याचा मोठा फटका बसला आहे. सांगली जिल्ह्याच्या कवठे महांकाळ तालुक्यातील अनेक गावात पिठाच्या गिरणी सोबतच तिथे तेल घाणे होते.
केवळ करडईची आवकच नसल्याने हे घाणे बंद पडले आहेत. अनेकजण घरचे तेल म्हणून घरातील करडई घेऊन तेल काढत असत; मात्र आता याठिकाणी केवळ बंद पडलेल्या घाण्यावरील अवजारांचे अवशेष शिल्लक आहेत.
तेल उद्योगासंबंधी साहित्य आता अक्षरशः अडगळीत पडले आहे. एकेकाळी आम्ही हा उद्योग करायचो, हीच काय ती आठवण सांगण्यासाठी या भंगाराची देखभाल करावी लागत आहे. करडईचे उत्पन्न घटल्यामुळे ही अवकळा आली आहे. तेल उद्योग आता परवडणारा न राहिल्याने इतकी वाईट परिस्थिती आहे. - नारायण शिंदे, तेल घाणा व्यावसायिक, घाटनांद्रे.
शेतकऱ्यांचा नगदी पिकांकडे कल
सध्या शेतमालाला मिळणारा कवडीमोल भाव, निसर्गाची अवकृपा त्यामुळे उत्पादन बेभरवशाचे ठरत आहे. निसर्गाच्या बदलामुळे शेतकऱ्यासमोर अनेक आव्हाने आवासून उभी आहेत.
तसेच दुष्काळी अनेक भागात पाणी आल्यामुळे शेतकरी ऊस, डाळिंब, द्राक्षे व अन्य नगदी पिके मिळवून आर्थिक स्तर उंचावण्याचा प्रयत्न करीत आहे. यामुळे पारंपरिक पिके घेण्याकडे शेतकरी फारसा उत्साही दिसत नाही.
रब्बी हंगामात करडईच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल असायचा; मात्र बदलत्या काळात नगदी उत्पन्न देणाऱ्या द्राक्ष, डाळिंब, ऊस लागवडीकडे शेतकरी वळले आहेत. पूर्व ज्वारी पिकात अंतरपीक म्हणून या पिकाचा समावेश असायचा; मात्र शेतकऱ्यांनी ज्वारी लागवडीकडे दुर्लक्ष केल्याने उत्पादन घसरले. - राजकुमार पाटील, उप कृषी अधिकारी, रांजणी विभाग, कवठेमहांकाळ जि. सांगली.
