घोडेगाव : आदिवासी शेतकऱ्यांनी पिकवलेली स्ट्रॉबेरी आदिवासी विकास विभागाने विकत घेऊन आश्रमशाळेतील मुलांना रोजच्या आहारात दिली आहे. प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांनी पुढाकार घेऊन हा अभिनव कार्यक्रम सुरू केला आहे.
आदिवासी विकास विभागाने केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेतून आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील ५५ शेतकऱ्यांना स्टॉबेरी लागवडीसाठी व साहित्य खरेदीसाठी अनुदान दिले आहे.
यातून शेतकऱ्यांनी संपूर्ण सेंद्रिय स्ट्रॉबेरी पिकवली आहे. पिकवलेली स्ट्रॉबेरी शेतकरी भीमाशंकरकडे जाणाऱ्या रस्त्यावर किंवा पुणेसारख्या बाजारपेठांमध्ये पाठवत आहेत.
प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांना, ही स्ट्रॉबेरी आपण खरेदी करून आश्रमशाळेतील मुलांच्या आहारात रोज खायला देऊ, अशी कल्पना सुचली.
त्यांनी स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना कळवून घोडेगाव येथे सुरू असलेल्या मध्यवर्ती स्वयंपाकगृहात आपण पिकवलेली स्ट्रॉबेरी आणून द्या, याठिकाणी वजन करून लगेच पैसे घेऊन जा, असे अवाहन केले.
याला शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला. स्ट्रॉबेरी खरेदीप्रसंगी सहायक प्रकल्प अधिकारी सोनुल कोतवाल, अधीरक्षक विपुल टकले, समाजसेविका जनाबाई उगले उपस्थित होते.
२५ किलो स्ट्रॉबेरी पहिल्याच दिवशी झाली जमाबोरघर परिसरातील शेतकऱ्यांनी २३० रुपये किलोप्रमाणे या स्ट्रॉबेरीची विक्री केली. विशेष म्हणजे, या उपक्रमाला शेतकऱ्यांनीही प्रतिसाद दिला.
शेतकऱ्यांनी सहभागी झाले पाहिजेआदिवासी शेतकऱ्यांनी पिकवलेली स्ट्रॉबेरी आदिवासी मुलांना खायला जात असल्याचा आज मनस्वी आनंद होत आहे. शेतकरी देखील याला चांगला प्रतिसाद देत आहेत. माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुढाकार घेऊन ही योजना सुरू करायला लावली व याचा चांगला फायदा शेतकऱ्यांना होत आहे, पुढील वर्षी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी झाले पाहिजे, असे अवाहन प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांनी सांगितले.
मनापासून आनंदकोणतेही औषध, खत न मारता संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली स्ट्रॉबेरी आमच्याच मुलांना खायला मिळत आहे. याचा मनापासून आनंद होतोय. प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांनी पुढाकार घेऊन सुरू केलेली योजना आज खऱ्या अर्थाने आदिवासींच्या कल्याणासाठी राबवली गेली असल्याचे यातून दिसले, असे स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी संतोष शेळके यांनी सांगितले.