Join us

यंदाच्या खरीपासाठी देशातील शेतकऱ्यांनी 'या' दोन पिकांना दिली अधिक पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 12:16 IST

Kharif Sowing Report 2025 कृषी मंत्रालयानुसार, यंदाच्या खरीप हंगामातील ८५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. देशभरात समाधानकारक पाऊस पडल्यामुळे पेरणीचे क्षेत्रसुद्धा वाढले आहे.

चंद्रशेखर बर्वेखाद्यतेलाच्या क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर बनविण्याचा सरकारचा प्रयत्न असला तरी तेलबियांचे उत्पादन घेण्यात शेतकरी फारसा उत्साही दिसून येत नाही. यंदा तेलबियांचे पेरणी क्षेत्र गेल्या हंगामाच्या तुलनेत चार टक्क्याने घटले आहे.

कृषी मंत्रालयानुसार, यंदाच्या खरीप हंगामातील ८५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. देशभरात समाधानकारक पाऊस पडल्यामुळे पेरणीचे क्षेत्रसुद्धा वाढले आहे.

१ ऑगस्ट रोजी ९३२.९३ लाख हेक्टरमध्ये पिकांची पेरणी पूर्ण झाली होती. महत्त्वाचे म्हणजे, मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा खरीप पिकांची पेरणी क्षेत्र तब्बल ४४.९६ लाख हेक्टरने वाढले आहे.

गेल्या हंगामात ८८७.९७ लाख हेक्टरमध्ये पेरणी झाली होती. यंदा पाच टक्क्याने वाढ झाली आहे. खरीप हंगामातील मुख्य पीक म्हणजे भात. यंदा ३१९.४० लाख हेक्टर क्षेत्रात धानाची पेरणी झाली आहे.

मागच्या वर्षी २७३.७२ लाख हेक्टर शेतीत धानाची लागवड करण्यात आली होती. मात्र, यावर्षी १६.६९ टक्क्याने धानाची शेती वाढली आहे.

डाळींच्या लागवडीखालील क्षेत्रात किरकोळ घट झाली आहे. यंदा १०१.२२ लाख हेक्टरमध्ये डाळी पेरल्या गेल्या आहेत. मागच्या वर्षी १०१.५४ लाख हेक्टरमध्ये डाळींची पेरणी झाली होती.महत्त्वाचे म्हणजे, तुरीची (अरहर/कबूतर वाटाणा) लागवड मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. मागच्या वर्षी ४१.०६ लाख हेक्टर क्षेत्रात तूर पेरली गेली होती. परंतु, आता ६.६८ टक्क्याने घट होत ३८.३२ लाख हेक्टरमध्ये डाळी पेरल्या आहेत.

भारताला मोठ्या प्रमाणावर खाद्य तेल आयात करावे लागते. या बाबतीत भारत आत्मनिर्भर व्हावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांनी तेलबियांची लागवड करावी, असे आवाहन सरकारने केले होते.

मात्र, शेतकऱ्यांनी याकडे फारसे लक्ष दिले नाही. यंदा १७१.०३ लाख हेक्टरमध्ये तेलबियांची लागवड करण्यात आली. मागच्या वर्षी १७८.१४ हेक्टरमध्ये तेलबियांची पेरणी झाली होती.

यावर्षी ९१.६२ लाख हेक्टरमध्ये मका लावला आहे. यंदा मक्याची लागवड ११.७४ टक्क्याने वाढली आहे. मका इथेनॉल उत्पादनाचे मुख्य स्रोत असल्यामुळे शेतकऱ्यांचा कल डाळी आणि तेलबियांऐवजी मक्याकडे वाढत असल्याचे यावरून दिसून येते.

भुईमूग ४.३३%, सूर्यफूल ११.९७% आणि सोयाबीन ३.९८% ने कमी झाले आहे. सोयाबीनखालील क्षेत्र १२३.४५ लाख हेक्टरवरून ११८.५४ लाख हेक्टरवर आले आहे.

उस कापूस लागवड परिस्थिती◼️ उसाची लागवड २.९४% ने वाढली आहे. यावर्षी ५७.३१ लाख हेक्टरमध्ये ऊस लावण्यात आला आहे. गेल्या वर्षी ५५.६८ लाख हेक्टरमध्ये ऊस लावण्यात आला होता.◼️  पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाने यंदा २.३६ टक्क्याने मार खाल्ला आहे. यंदा १०५.८७ लाख हेक्टरमध्ये कापूस लावण्यात आला आहे.

अधिक वाचा: Jamin Mojani : शेतजमीन मोजणी जलद होण्यासाठी महसूल विभागाचा मोठा निर्णय: वाचा सविस्तर

टॅग्स :पेरणीभारतशेतकरीशेतीपीकमकाभातऊससोयाबीनपाऊसकापूस