लिंगनूर : मिरज पूर्व भागात हरभरा पिके जोमात आली आहेत आणि सध्या हरभऱ्याच्या भाजीची मागणी वाढली आहे, ज्याचा दुहेरी फायदा उत्पादकांना होणार आहे.
यावर्षी थंडी उशिरा आल्यामुळे रब्बी पिकांवर परिणाम झाला आहे. पण, याचा लाभ हरभऱ्याच्या भाजीला मिळतोय. हरभऱ्याची भाजी प्रतिकिलो ८० ते १०० रुपयांच्या दराने विकली जात असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
ग्रामीण भागात आवडीने खाल्ली जाणारी ही भाजी सध्या शहरी बाजारपेठेतही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. हिरवीगार, कोवळी आणि चविष्ट असल्यामुळे घरगुती वापरासाठी या भाजीची मागणी वाढली आहे.
ही भाजी दररोजच्या आहारात नसली तरी हंगामात ग्रामीण भागात ती आवर्जून खरेदी केली जाते. ताजी भाजी वापरून नंतर उर्वरित भाजी वाळवून साठवण्यासाठी ठेवण्याची पद्धत ग्रामीण आणि शहरी भागात प्रचलित आहे.
हिवाळ्यात थंडी जाणवू लागल्यास हरभऱ्याची वाढ जोमाने होते. ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पाण्याची सोय आहे, त्या भागात हरभरा उत्पादनास चांगला वाव मिळतो.
भाजी खुडण्यास प्राधान्य
◼️ हरभऱ्याच्या झाडाच्या मुळाला न धक्का देता कोवळे शेंडे खुडले जातात.
◼️ भाजी खुडल्यामुळे हरभऱ्याला अधिक फुटवे येतात.
◼️ ज्यामुळे फूल व फळधारणा चांगली होते आणि उत्पादन वाढते.
◼️ म्हणूनच अनेक शेतकरी भाजी खुडण्यास प्राधान्य देत आहेत.
दुहेरी उत्पन्न देणारे पीक
◼️ हरभऱ्याच्या झाडाचे कोवळे शेंडे तोडल्यानंतर झाडाची वाढ अधिक चांगली होते आणि फुटवे तयार होतात.
◼️ पुढील टप्प्यात भरघोस उत्पादन मिळते. सध्या अनेक शेतकरी महिला हरभऱ्याचे शेंडे काढत आहेत.
◼️ भाजी विक्रीतून मिळणारे उत्पन्न आणि पुढील धान्य उत्पादन अशा दोन्ही स्वरूपात लाभ मिळत असल्याने हरभरा हे दुहेरी उत्पन्न देणारे पीक ठरत आहे.
अधिक वाचा: ढगाळ वातावरणात कीड व रोगांपासून कसे कराल आंबा पिकाचे संरक्षण? वाचा सविस्तर
