रत्नागिरी : फळपीक विमाधारक शेतकऱ्यांनी वेगाचे वारे २५ कि.मी. प्रति तास किंवा त्यापेक्षा जास्त होऊन आंबा पिकाचे नुकसान झाल्यास काय कराल?
तर ७२ तासात विमा कंपनीकडे (टोल फ्री क्र. १४४४७) किंवा कृषी विभागाकडे तक्रार दाखल करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार सन २०२४-२५ मध्ये आंबा काजू पिकाकरिता भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत राबवण्यात येत आहे.
जिल्ह्यात सन २०२४-२५ मध्ये फळपीक विमा योजनेत आंबा पिकासाठी ३० हजार १३५ शेतकऱ्यांनी व काजू पिकासाठी ६ हजार ३३३ शेतकऱ्यांनी असे एकूण ३६ हजार ४६८ शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग घेतला आहे.
जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून अवकाळी पावसाचे वातावरण झाले असून, वेगाचे वारे २५ कि.मी. प्रति तास किंवा त्यापेक्षा जास्त होऊन आंबा पिकाचे नुकसान झाले असल्यास फळपीक विमाधारक शेतकऱ्यांनी ७२ तासात तक्रार दाखल करणे आवश्यक आहे.
संबंधित विमा कंपनी, महसूल विभाग व कृषी विभागाच्या मदतीने वैयक्तिक पातळीवर पंचनामे करून नुकसानाचे प्रमाण निश्चित करेल. मात्र तक्रार दाखल न केल्यास फक्त हवामान केंद्रावरील वेगाच्या वाऱ्याची नोंद नुकसान भरपाईसाठी पात्र होणार नाही.
दि. १६ एप्रिल ते दि. १५ मे या कालावधीमध्ये कोणत्याही दिवशी वाऱ्याचा वेग २५ कि.मी. प्रति तास राहिल्यास नुकसानभरपाई रक्कम २० हजार २६ प्रति हेक्टर देय राहील.
दि. १६ एप्रिल ते दि. १५ मे या कालावधीमध्ये कोणत्याही दिवशी वाऱ्याचा वेग २५ कि.मी. प्रति तास पेक्षा जास्त राहिल्यास नुकसानभरपाई रक्कम ३४ हजार रुपये प्रति हेक्टर देय असल्याचे सदाफुले यांनी कळविले आहे.
अधिक वाचा: कृषी पाठोपाठ आता महसूल विभागानेही घेतला हा निर्णय; नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्याकडे पाहिजे हा नंबर