बेळगाव : कर्नाटकातीलऊस उत्पादक शेतकऱ्यांनी प्रतिटन ३५०० रुपये दराच्या मागणीसाठी छेडलेल्या आंदोलनाला शुक्रवारी दुपारी बेळगाव जिल्ह्यात हिंसक वळण लागले.
हत्तरगी टोलनाका येथे निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी पोलिसांसह महामार्गावरील वाहनांवर दगडफेक केली. त्यात सहा पोलिस जखमी झाले.
ऊसदराच्या मागणीसाठी बेळगाव जिल्ह्यातील गुरलापूर येथे गेल्या नऊ दिवसांपासून आंदोलन सुरु होते. त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी शेतकरी आंदोलन झाले.
अखेर कर्नाटकसरकारने उसाला प्रतिटन ३,३०० रुपये दर जाहीर केला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
बैठकीत साखर कारखानदार तसेच ऊस उत्पादक, शेतकरी नेते उपस्थित होते. पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांना ३,२०० रुपये दिले जातील.
त्यानंतर सहा महिन्यांच्या आत सरकारकडून ५० रुपये आणि साखर कारखान्यांकडून ५० रुपये असे एकूण प्रति टन ३,३०० रुपयांचा दर निश्चित करण्यात आला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी यापूर्वी प्रतिटन ३,५०० रुपयांचा दर देण्याचा आग्रह धरला होता.
दरम्यान मुख्यमंत्र्यांनी बंगळुरू येथील बैठकीत ३,३०० रुपये प्रतिटन उसाला दर देण्याचे जाहीर केल्यानंतर गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या गुरलापूर येथील आंदोलनस्थळी शेतकऱ्यांनी मोठा आनंदोत्सव साजरा केला.
अधिक वाचा: चालू गळीत हंगामात 'ह्या' साखर कारखान्याने उसाला दिला राज्यात सर्वाधिक दर
