Join us

यंदा सुरु ऊस लागवडीला शेतकऱ्यांची पसंती; आडसालीचे क्षेत्र कशामुळे घटले? जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 12:38 IST

जास्तीचे उत्पादन देणाऱ्या आडसाली उसाचे क्षेत्र सहा हजार हेक्टरने घटले असून, कमी उत्पादन देणाऱ्या उसाचे क्षेत्र गतवर्षीपेक्षा १३ हजार हेक्टरने वाढले आहे.

आयुब मुल्लाखोची : जास्तीचे उत्पादन देणाऱ्या आडसाली उसाचे क्षेत्र सहा हजार हेक्टरने घटले असून, कमी उत्पादन देणाऱ्या उसाचे क्षेत्र गतवर्षीपेक्षा १३ हजार हेक्टरने वाढले आहे.

पूर्वहंगामी उसाच्या क्षेत्रात दोन हजार हेक्टरची घट झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या हंगामात उत्पादनात घट होणार आहे. एकूण उसाच्या क्षेत्रात मात्र वाढ झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात उसाचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ८६ हजार २१५ हेक्टर आहे. यामध्ये जून, जुलैमध्ये होणाऱ्या आडसाली लावणीचे क्षेत्र गतवर्षीपेक्षा सहा हजार हेक्टरने घटले आहे.

आडसाली उसाचा उतारा गुंठ्याला दीड ते दोन टनांपर्यंत पडतो. १५ ते १६ महिन्यांनी या उसाची तोड होते. उसाला फुटवा चांगला पडतो. ऊस पक्वतेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे उतारा चांगला पडतो. दोन पाऊस या उसाला मिळतात.

परंतु, गतवर्षी पाऊस जोरात झाला. त्यामुळे जून, जुलैमध्ये लावणीवेळी अडथळा निर्माण झाला. उसाच्या रोपांची लावणपण कमी झाली. हा ऊस पडतो त्यामुळे तोडणीवेळी ऊसतोड मजूर कचरतात.

ऊसतोडणी यंत्र पडलेला ऊस तोडण्यास शक्यतो नकार देतात. त्या दोन्ही कारणांनी या उसाच्या क्षेत्रात घट झाली. गतवर्षी २६ हजार १६७ हेक्टर क्षेत्र होते. सध्या ते २० हजार २२३ हेक्टर झाले आहे.

सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये पूर्व हंगामी उसाची लावण केली जाते. गतवर्षी ४१ हजार ३७४ हेक्टर क्षेत्र होते. ते सध्या ३९ हजार ७३४ हेक्टर झाले आहे. डिसेंबर, जानेवारीमध्ये सुरूच्या लागणी नोंद ४९ हजार १६५ हेक्टर झाली आहे.

गतवर्षीपेक्षा १३ हजार हेक्टरने क्षेत्र वाढले आहे. या दोन्ही उसाचा उतारा अनुक्रमे टन ते सव्वा पडतो असे गृहीत धरले जाते. बारा ते तेरा महिन्यात ऊस तोड मिळते. खोडवा क्षेत्र सुद्धा गतवर्षीपेक्षा दीड हजार हेक्टरने घटले आहे.

एकूण ऊस क्षेत्रात म्हणावा तेवढा फरक नसला तरी उत्पादनघटीचा फटका येणाऱ्या हंगामात बसणार आहे. ऊस लवकर जावा तोही विनाकटकटीचा या हेतूने सुरू हंगामातील क्षेत्र वाढले आहे.

आडसालीत '८६०३२' जास्त१०००१ व २२००५ या उसाच्या जाती लवकरच पक्व होतात. त्यामुळे पूर्व व सुरू हंगामात त्यांची लावण मोठ्या प्रमाणात केली जात, तर ८६०३२ या उसाची लावण आडसाली म्हणून जास्त केली जाते. कोल्हापूर जिल्ह्यात याचे प्रमाण जास्त होते.

अधिक वाचा: दस्त नोंदणी झाली सोपी; आता तुमच्या जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यातून करता येणार जमिनीचा दस्त

टॅग्स :ऊसशेतकरीशेतीलागवड, मशागतसाखर कारखानेकोल्हापूरपाऊस