संतोषकुमार गवई
अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील कोठारी खुर्द येथील ३० एकर माळरानावर हलक्या प्रतीच्या जमिनीत हापूस, आम्रपाली, मलिका, दशहरी, केशर आंबा तसेच काजू, संत्रा, मोसंबी, लिंबू, करवंद, जांभूळ व फणस यांसारख्या अपारंपरिक पिकांची यशस्वी लागवड करून नफ्याची शेती करण्याचा यशस्वी प्रयोग शेतकरी सुनील गाडगे यांनी केला आहे.
गाडगे यांनी शेतात दशहरी १६०, मल्लिका १५ व आम्रपाली ७५ अशी आंब्याची एकूण ३०० झाडे असुन संत्रा २.५ एकर, लिंबू १० एकर, मोसंबी १३ एकर, करवंद २०० झाडे, जांभूळ १२ झाडे व फणसाच्या ७ झाडांची लागवड केली आहे.
पिकांची यशस्वी लागवड
कोकणात प्रसिद्ध असलेला हापूस आंबा, काजू, आम्रपाली, मल्लिका, दशहरी व फणस विदर्भात यशस्वी करून दाखवला. व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्याने त्यांचे उत्पादन ठराविक दरातच विकले जाते. त्यामुळे शेती अधिक फायदेशीर ठरली आहे.
हॉटेल व्यवसाय सोडून शेतीत मोठा नफा!
कधी काळी हॉटेल व्यवसायात यशस्वी असलेले सुनील गाडगे यांनी तो व्यवसाय बंद करून अपारंपरिक शेतीकडे वाटचाल केली. संपूर्ण महाराष्ट्रातील कृषी प्रदर्शनांना भेट देत त्यांनी विविध शेती तंत्रज्ञानाचा अभ्यास केला. पहिल्या टप्प्यात त्यांनी पुरेशा पाण्याची व्यवस्था करून महाराष्ट्रातील कोकण पट्टयातून उच्च दर्जाच्या आंब्याच्या रोपांची लागवड केली.
शेती नफ्याचा व्यवसाय
मी शासकीय योजनांचा लाभ घेतला नाही. शेतीकडे नीट लक्ष दिल्यास ती नफ्याची ठरू शकते. हॉटेल व्यवसाय सोडला. पण, शेतीत जास्त नफा मिळत आहे. बाजारात जायला लागत नाही. व्यापारी थेट शेतावर येतात. त्यामुळे आत्महत्या नको, नफ्याची शेती करा. या प्रयोगशील शेतीतून दरवर्षी १२ लाखांहून अधिक उत्पन्न मिळवतो. - सुनील गाडगे, प्रयोगशील शेतकरी