Join us

Farmer on Social Media शेतकऱ्यांसाठी सोशल मीडिया ठरतेय वरदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 13:01 IST

एरवी विविध कारणांमुळे डोकेदुखी ठरणारा सोशल मीडिया शेती आणि शेतकऱ्यांसाठी मात्र वरदान ठरत आहे. हवामानातील बदलामुळे अचूक हवामान अंदाज घेतल्याशिवाय शेती करणे अशक्य आहे.

ओतूर : जुन्नर तालुक्यात एरवी विविध कारणांमुळे डोकेदुखी ठरणारा सोशल मीडियाशेती आणि शेतकऱ्यांसाठी मात्र वरदान ठरत आहे. हवामानातील बदलामुळे अचूक हवामान अंदाज घेतल्याशिवाय शेती करणे अशक्य आहे.

अशा परिस्थितीत अचूक हवामान बदल, घरगुती बी-बियाणे, पशुधन, शेती औजारे, तयार शेतीमाल याची खरेदी-विक्री या सर्वांसाठी सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म शेतकरी मोठ्या प्रमाणावर जुन्नर तालुक्यात वापरत आहेत.

माहिती तंत्रज्ञानाच्या युगात लहानापासून मोठ्यापर्यंत स्मार्ट फोन प्रत्येकाच्या हातात आला आहे. इंटरनेटच्या आधारे क्षणात परिसरातील वार्ता सहज उपलब्ध होतात. त्यात बळीराजाही आता मागे राहिला नाही.

हवामान अंदाज ते कृषीविषयक खरेदी-विक्रीसाठी होतो व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम आदी माध्यमांवर रोज अनेक लिंक मोबाइलवर येत असतात याचाही वापर शेतकरी मोठ्या प्रमाणात करताना पाहायला मिळत आहे.

शेतीच्या हंगामाची तयारी करताना शेतकरी मोबाइल फोनचा आधार घेत आहेत. परिसरातील शेतीविषयक माहितीबरोबर दुसऱ्या भागातील प्रयोगशीलता सहजपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे शक्य होत आहे.

आता मान्सून जवळ आल्याने बळीराजा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी सज्ज झाला आहे. खरीपपूर्व मशागतीची कामे शेतकरी सुरू करणार आहेत त्याचे वेध सध्या लागले आहेत.

पेरणी व विविध भाजीपाला, फळबाग आदीच्या लागवडीचे, त्यात खत व्यवस्थापन, पिकातील अंतर, औषध फवारणी, त्याची मात्रा आदींची माहिती सहज उपलब्ध होत असल्याने यासाठी शेतकरी सोशल मीडियाचा आधार घेत आहे.

तालुका तसेच गाव पातळीवर सोशल मीडियाचे ग्रुप करून विविध पिके, त्यांची लागवड करण्याच्या पद्धती आदींच्या माहितीची देवाण-घेवाण शेतकरी करत आहे.

सोशल मीडिया आल्यापासून शेतकऱ्याला खरोखर त्याचा फायदा झाला आहे कारण कोणत्या वातावरणात पीक चागलं येऊ शकते, मार्केटचे बाजारभाव, पिकावर आलेले रोग, उत्पादन क्षमता, खत औषधे कोणती वापरावी, लावणीपासून काढणीपर्यंत सर्वच पिकाची माहिती मिळते, घरी बसून आपल्याला शेतीविषयी माहिती मिळते, शेतीविषयक चर्चासत्रदेखील ऑनलाइन झाल्याने त्यामुळे सोशल मीडिया वरदान ठरत आहे. - पंकज घोलप, प्रगतशील शेतकरी

अधिक वाचा: BBF Sowing हे पेरणी यंत्र करतंय एकावेळी चार कामे

टॅग्स :शेतकरीखरीपशेतीपीक व्यवस्थापनपीकलागवड, मशागतमाहिती तंत्रज्ञानसोशल मीडिया