पुणे : कृषी विभागाने २०२३ मधील रब्बी हंगामात घेतलेल्या राज्यस्तरीय पीक स्पर्धेचा निकाल जाहीर केला आहे.
ज्वारी पिकात सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील तिसंगी येथील चंद्रसेन नारायण पाटील यांनी तब्बल ८० क्विंटल ५५ किलो घेतले आहे.
गहू पिकात नाशिक जिल्ह्यातील एकलहरे येथील गोरखनाथ पोपटराव राजोळे यांनी ९६ क्विंटल २८ किलो उत्पादन घेऊन प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
आदिवासी गटात पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील अवसरी येथील यमुनाबाई विठ्ठल मोहरे यांनी गहू पिकाचे ५० क्विंटल ९९ किलो हेक्टरी उत्पादन घेऊन राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे.
राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या पीक उत्पादकतेबाबत प्रोत्साहन मिळावे यासाठी तसेच कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल.
त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेवून राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.
राज्यात रब्बी हंगाम २०२३ मध्ये ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस या ५ पिकांसाठी पीकस्पर्धा आयोजन करण्यात आली होती. पीकस्पर्धेसाठी तालुका हा घटक आधारभूत धरण्यात येतो.
शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत घेऊन राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील बक्षिसे देण्यात येतात. रब्बी हंगाम सन २०२३ पीकस्पर्धेचे राज्यस्तरीय निकाल कृषी आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय पीकस्पर्धा निकाल समितीद्वारे जाहीर करण्यात आले.
ज्या शेतकऱ्याची स्पर्धेत भाग घेतलेल्या पिकांची उत्पादकता तालुक्याच्या त्या पिकाच्या सरासरी उत्पादकतेच्या (त्या पिकाची मागील ५ वर्षांची सरासरी उत्पादकता) दीडपट किंवा त्यापेक्षा अधिक आहे अशा शेतकऱ्यांना पीकस्पर्धेतील पुरस्कारासाठी पात्र समजण्यात येते.
राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकास ५० हजार द्वितीय क्रमांकास ४० हजार, तर तृतीय क्रमांकास ३० हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. जिल्हा पातळीवरील प्रथम क्रमांकास १० हजार द्वितीय क्रमांक ७ हजार तर तृतीय क्रमांकास ५ हजार रुपयांचे बक्षीस असेल तर तालुका पातळी प्रथम क्रमांकास ५ हजार, द्वितीय क्रमांकास ३ तर तृतीय क्रमांक २ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, अशी माहिती कृषी विभागाने दिली.
अवसरीच्या यमुनाबाई मोहरेंना जिल्ह्यातील दुसरा पुरस्कार
रब्बी हंगामात घेतलेल्या पीक स्पर्धेच्या निकालामध्ये आदिवासी गटामध्ये पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील अवसरी येथील यमुनाबाई विठ्ठल मोहरे यांच्या पिकाची निवड करण्यात आलेली आहे. त्यांनी गहू पिकाचे ५० ५० क्विंटल २९ किलो हेक्टरी उत्पादन घेऊन महाराष्ट्र राज्यामध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे.
अधिक वाचा: कृषी विभाग रब्बी हंगाम सन २०२३ राज्यस्तरीय पिकस्पर्धेचा निकाल जाहीर; पहा विजेत्या शेतकऱ्यांची यादी