वाशिम जिल्ह्याच्या मंगरुळपीर तालुक्यातील गोगरी परिसरात मनरेगा योजनेंतर्गत संत्रा फळबागेचे अनुदान रखडल्याबाबत विचारणा करणाऱ्या शेतकऱ्याला तालुका कृषी अधिकाऱ्याने बुटाने व मातीच्या ढेकळाने मारहाण केल्याची चित्रफित समाजमाध्यमांवर 'व्हायरल' झाली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओबाबत बोलताना तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे यांनी मात्र सर्व आरोप फेटाळले आहेत.
गोगरी येथील शेतकरी ऋषिकेश पवार यांनी दोन वर्षांपूर्वी मनरेगा योजनेंतर्गत तीन एकर क्षेत्रावर संत्रा फळबाग लावली होती. या फळबागेसाठी शासनाकडून मिळणारे अनुदान मागील चार महिन्यांपासून रखडल्याचा त्यांचा आरोप आहे. अनुदान मिळण्यासाठी कृषी कार्यालयाकडे वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप ठोस उत्तर मिळाले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, मंगरुळपीरचे तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे हे गोगरी शिवारात पाहणीसाठी गेले असता, ऋषिकेश पवार यांनी त्यांच्याकडे प्रलंबित अनुदानाबाबत विचारणा केली. यावेळी दोघांमध्ये वाद झाल्याचे सांगण्यात येते. आरोपानुसार, जाब विचारत असताना तालुका कृषी अधिकाऱ्याने शेतकऱ्याच्या अंगावर धाव घेत बुटाने मारहाण केली. याशिवाय, शेतात पडलेली मातीची ढेकळे उचलून मारल्याचा आरोप करण्यात आला आहे.
स्थानिक शेतकऱ्यांद्वारा तीव्र निषेध
या घटनेनंतर संबंधित अधिकाऱ्याने शेतकऱ्याला 'तुला गुन्ह्यात अडकवीन' अशी धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. घटनेची माहिती परिसरात पसरताच शेतकरी संघटनांचे पदधिकारी व स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र निषेध नोंदविला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोर्षीवर कडक कारवाई करण्याची मागणी तालुक्यातील शेतकरी संघटनांनी केली आहे.
मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल!
तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे यांनी शेतकरी ऋषिकेश पवार यांना बुटाने मारहाण केल्याचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यामध्ये शेतकऱ्याला बुटाने मारहाण होत असल्याचे दृश्य दिसत असल्याचा दावा केला जात आहे.
गोगरी येथे एका शेतकऱ्याच्या शेतात तपासणी सुरू असताना इतर दोन व्यक्ती तेथे आल्या. त्यांनी महिला कर्मचाऱ्याशी उद्धट भाषेत संवाद साधला. त्यातील एक व्यक्ती महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर धावली. तो संबंधित शेतकरीही नव्हता. परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. मी अंगावर धावलो असलो, तरी मारहाण अजिबात केलेली नाही. माझ्यावरील आरोप पूर्णतः खोटे आहेत. - सचिन कांबळे, तालुका कृषी अधिकारी.
