अयोध्याप्रसाद गावकर
देवगड : देवगड तालुक्यामध्ये फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस व मार्च महिन्यामध्ये सातत्याने तापमानात बदल होत राहिल्यामुळे आंबा भाजणे व आंबा उत्पादनावर अतितापमानामुळे परिणाम झाला आहे.
यामुळे पीकविम्याचा लाभ यावर्षी तरी विमा कंपनी देणार का? की पुन्हा एकदा बागायतदारांची लूटमार विमा कंपनी करणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
यावर्षी भारतीय कृषी पीकविमा कंपनीकडे आंबा बागायतदारांनी विमा उतरवला आहे. कमी-जास्त तापमान, अवकाळी पाऊस, गारपीट, वादळ अशी आपत्ती झाल्यास फळपीक विम्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो.
देवगड तालुक्यामधील सुमारे ४ हजार आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी फळपीक विमा उतरवला आहे. कोट्यवधी रुपयांचा विमा देवगड तालुक्यामधून त्या त्या वर्षी त्या-त्या इन्शुरन्स कंपनीकडे उतरवला जातो.
मात्र, अवकाळी पाऊस पडूनही दोन वर्षांपूर्वी विमा कंपन्यांनी पीकविम्याचा फायदा शेतकऱ्यांना न देता शेतकऱ्यांची फसवणूक केली होती. यावर्षी देवगड तालुक्यामध्ये फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस तापमानात सातत्याने वाढ होत गेली.
त्यामुळे आंबा बागायतदार मोठ्या अडचणीत सापडले आहेत. वाढत्या उष्णतेमुळे आंबा कणी गळून पडणे, आंबा भाजणे यामुळे आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे.
रात्रीचे २५ अंश सेल्सिअस तापमान तर दिवसाचे ४० अंशांहून अधिक तापमान असते. यामुळे याचा विपरित परिणाम आंबा पिकावर होत आहे.
देवगड हापूसचे यावर्षी उत्पादन हे २५ टक्केच आहे. यामध्ये हवामानामध्ये सातत्याने बदल होत राहिल्याने उत्पादनामध्ये आणखीनच घट होण्याची शक्यता आंबा बागायतदारांकडून वर्तविण्यात येत आहे.
फळपीक विम्याचा फायदा शेतकऱ्यांना
◼️ ११ डिसेंबर ते १५ मेपर्यंतच्या कालावधीमध्ये अवकाळी पाऊस, कमी-जास्त तापमान, गारपीट झाल्यास या फळपीक विम्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळतो. तसेच काजू पिकालादेखील फळपीक विम्याचा फायदा घेता येतो.
◼️ देवगड तालुक्यामध्ये सुमारे ४० ते ४५ हजार हेक्टरवर आंबा लागवड करण्यात आली आहे तर सुमारे ६ हजार हेक्टरवर काजू लागवड आहे. प्रत्येक महसूल मंडळनिहाय सयंत्रणा बसविण्यात आली आहे. यावरून किती मिलिमीटर पाऊस पडतो, याची नोंद असते.
◼️ ही सयंत्रणा नादुरुस्त असल्यामुळे याचा विपरित परिणाम फळपीक विमा घेतलेल्या आंबा बागायतदारांवर होत आहे. देवगड तालुक्यामध्ये देवगड, पडेल, पाटगाव, मिठबाव, बापर्डे, शिरगाव, तळवडे अशी महसूल मंडळे आहेत.
फळपीक विम्याचा फायदा मिळणे गरजेचे
मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये देवगड तालुक्यात ३८ ते ४० डिग्री सेल्सिअस तापमान राहिले. ३७ डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान वाढल्यास शेतकऱ्यांना फळपीक विम्याचा फायदा होतो. यावर्षी मार्च महिन्यामध्ये १२ दिवस सलग ३८ ते ४० डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान राहिले आहे. यामुळे फळपीक विम्याचा फायदा यावर्षी कमी-जास्त तापमान राहिल्यामुळे आंबा बागायतदारांना मिळणे गरजेचे आहे.
उष्मा वाढतोय अन् आंबा भाजतोय
सध्या वाढलेल्या उष्णतेमुळे आंबा भाजून बागायतदारांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. गेल्या वर्षी रिलायन्स इन्शुरन्स कंपनीकडे फळपीक विमा उतरविण्यात आला होता. दरवर्षी इन्शुरन्स कंपनी बदलत राहते. यावर्षी भारतीय कृषी विमा कंपनीकडे फळपीक विमा उतरवला आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत दरवर्षी फळपीक विमा उतरवणे गरजेचे असते.
अधिक वाचा: Mango Harvesting : आंबा फळातील नुकसान टाळण्यासाठी आंब्याची काढणी कशी करावी? वाचा सविस्तर