विठ्ठल खेळगीआपल्याला कुसुमाग्रजांची 'कणा' ही कविता माहीतच आहे. निसर्गाचा खेळ कोणाच्याच हातात सापडलेला नाही. एकदा दिलं, तर भरभरून देतो. नाहीतर होतं नव्हतं सारंच हिरावून घेतो.
अशीच काहीशी परिस्थिती सोलापूर जिल्ह्याची झाली आहे, कारण पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे. पिके पाण्यात वाहून गेली. बांध फुटले. गावची गावे पाण्यात होती.
या पाण्यात शेतकऱ्यांची स्वप्ने वाहून जात आहेत. बळीराजा हतबल झाला आहे. हा बळीराजा नेहमीच अशा अनेक संकटांना सामोरे जातो. निसर्गाशी नपंडाव खेळतो; मात्र हरत नाही. खचत नाही.
झाले गेले बाजूला सारून पुन्हा नव्या उमेदीने उभारी घेण्यासाठी धडपडतो. 'मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा...' म्हणत हा जगाचा पोशिंदा पुन्हा निसर्गाशी चार हात करीत परिस्थितीला थिराने सामोरे जात आहे.
शहरात मागील १३० वर्षात कधीच पडला नव्हता एवढा मोठा पाऊस पडला. अनेकांच्या घरात पाणी शिरले. दिवस-रात्र पाण्यात काढले. अनेकांचे संसार आज उघड्यावर आले आहेत. परिस्थिती अतिशय भयानक बनली आहे.
अशा परिस्थितीत पंचनामे करताना जी कागदपत्रे नाहीत, त्या कागदोपत्रांची मागणी अधिकारी करीत आहेत. त्यामुळे मदत मिळेलच, ही आशा नागरिकांना राहिलीच नाही.
ग्रामीण भागातील परिस्थिती याहून भयानक आहे. एक नव्हे दोन नव्हे, तर तब्बल ४५ मंडळांत अतिवृष्टी झाली आहे, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्याला सर्वाधिक फटका बसला. करमाळा, बार्शी व सांगोला तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस झाला.
अनेक गावांना पाण्याने वेढा घातला, लोकांची घरे पाण्यात तर गेली आहेत, शिवाय ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालयामध्ये गुडघाभर पाणी साचले होते. लोकांची कागदोपत्रे भिजून गेली आहेत.
सीना नदीला कधी नव्हे मोठा पूर आला. कसला हा पाऊस. कधी बघितलाच नव्हता. शेतकऱ्यांची काय अवस्था करून ठेवली आहे. आता पुढे काय होणार, पिके तरी गेली. वापसा कधी येणार माहीत नाही. घरातील साहित्य भिजून गेले.
अशाही परिस्थितीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आशा सोडली नाही. प्रशासन पंचनामा करेल, तुटपुंजी मदत देईल, त्यातही अनेक निकष, अटी, नियम आहेतच, यापेक्षा शासनाची मदतच नको, अशा भावना अनेक शेतकऱ्यांची आहे.
कारण, हा शेतकरी कोणाच्या जिवावर. कोणाच्या आशेवर जगत नाही. तो केवळ स्वतःच्या हिमतीवर आणि कष्टाच्या बळावर स्वप्ने पाहतो आणि लढतो. इथेही कवी कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या कणांमधील ओळीच आठवतात.
'गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून'. माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.
कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत-हसत उठला, पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून, फक्त लढ म्हणा.
अधिक वाचा: Pik Nuksan Bharpai : पिकांसाठी भरपूर खर्च केला पण सगळा पावसाने धुऊन गेला; हेक्टरी किती मिळणार मदत?