सोलापूर : जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांकडे आजही शेतकऱ्यांचे एफआरपीनुसार १७ कोटी रुपये दिले नाहीत तर शेतकऱ्यांनी शेती कशी करायची? हा प्रश्न उपस्थित होत आहे. यंदाचा साखर हंगाम सुरू होऊन पंधरा दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे.
मागील गळिताला आणलेल्या उसाचे पैसे मागील तीन-चार महिन्यात म्हणजे सहा-सात महिने उशिराने मिळाले आहेत व ते आजही मिळत आहेत.
म्हणजे दोन वर्षांखाली लागवड केलेला ऊस वर्षभर जोपासलेला ऊस मागील वर्षी साखर कारखाने घेऊन गेले व त्याचे पैसे सहा महिन्यांनंतर मिळत आहेत.
आता दोन वर्षांखाली लागवड केलेल्या उसाचे अद्याप पैसे मिळाले नाहीत तर शेतकऱ्यांनी जगायचे कसे, हा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.
सिद्धेश्वर साखर कारखान्याकडे एफआरपीप्रमाणे १० कोटी, मातोश्री लक्ष्मी शुगरकडे पाच कोटी, तर गोकुळ शुगरकडे दोन कोटी असे १७ कोटी मागील वर्षी आणलेल्या उसाचे देणे आहे.
एफआरपीपेक्षा अधिक रक्कम कारखाने जाहीर करीत असल्याने ती रक्कम आणखीन काही कोटी वाढत आहे. यंदाचा ऊस गाळप हंगाम सुरू होऊन अठरा दिवस होऊन गेले आहेत. मात्र मागील वर्षाची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही.
गाळप परवान्यासाठी अर्ज नाही
◼️ यंदा जिल्ह्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. ऊस क्षेत्र अधिक असल्याने गाळपाला ऊस वेळेवर व ऊस बिले वेळेवर देणाऱ्या साखर कारखान्याने तोडणी करावी.
◼️ शिवाय ऊस तोडणीसाठी जानेवारीनंतर मोठ्या प्रमाणावर पैसे द्यावे लागतात त्यामुळे लवकर ऊस तोडणी व्हावी, अशी शेतकऱ्यांची धारणा आहे.
◼️ जिल्ह्यातील तीन-चार साखर कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी अर्ज केले नाहीत तर अर्ज केलेल्यांपैकी काहींनी मागील वर्षाची एफआरपी दिली नाही.
अधिक वाचा: यंदाच्या गाळपासाठी राजारामबापू कारखान्यांच्या तिन्ही युनिटचा ऊस दर जाहीर; कसा दिला दर?
