सोलापूर जिल्ह्यातील आठ साखर कारखानदारांनी ऑगस्ट महिन्यातही शेतकऱ्यांच्या उसाचे ५३ कोटी ४० लाख रुपये दिले नसल्याचे साखर सहसंचालक कार्यालयाकडील माहितीवरून दिसत आहे.
असे असले तरी काही साखर कारखानदारांनी संपूर्ण एफआरपी न देता दिल्याचे दाखविले ही बाब वेगळीच आहे. यावर्षीच्या साखर हंगामाची तयारी जिल्ह्यातील ३५ साखर कारखान्यांनी केली आहे.
तोडणी यंत्रणा व इतर कारणांमुळे एखादा साखर कारखाना सुरू होण्यावर प्रश्नचिन्ह आहे. मात्र, यंदा ३२ ते ३४ साखर कारखाने हंगाम घेतील, असे सांगण्यात आले.
तशी तयारी असली तरी मागील हंगामाचे ऊस उत्पादकांचे पैसे अडकवणारे यामध्ये १० साखर कारखाने आहेत. यातील काही शेतकऱ्यांना दरवर्षीच वेळेवर पैसे देत नाहीत.
पैसे न देता दिल्याचे दाखविले
◼️ ऑगस्ट महिनाअखेर आला तरी सात साखर कारखानदारांनी मागील हंगामाचे जवळपास ५४ कोटी रुपये शेतकऱ्यांचे दिले नाहीत.
◼️ साखर सहसंचालक कार्यालयाकडील ही आकडेवारी असली तरी शेतकऱ्यांचे संपूर्ण पैसे न देता दिल्याचे दाखविणारेही काही कारखाने आहेत. त्यामुळे ऊस उत्पादकांसाठी जाहीर केलेल्या दराप्रमाणे शेतकऱ्यांचे संपूर्ण देणे कधी चुकते होणार? याचे उत्तर नाही.
कोणाकडे किती थकीत (₹)
सिद्धेश्वर साखर कारखाना - २३ कोटी १५ लाख
इंद्रेश्वर शुगर बार्शी - २ कोटी ६१ लाख
जय हिंद शुगर - १० कोटी ८८ लाख
गोकुळ शुगर - ६ कोटी ४ लाख
सिद्धनाथ शुगर (तिऱ्हे) - १ कोटी ८५ लाख
भीमा सहकारी (टाकळी सिकंदर) - १ कोटी १९ लाख
मातोश्री लक्ष्मी शुगर - ५ कोटी ३८ लाख
सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखाना - २ कोटी ६१ लाख
जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडील माहितीच्या आधारे एफआरपी थकबाकीची आकडेवारी आहे. एफआरपी न देता दिल्याचे अहवाल दिल्याच्या तक्रारीवर नोटीस देऊन माहिती मागवली आहे. थकबाकी न देणाऱ्या साखर कारखान्यांवर आरआरसीनुसार महसूल विभाग कारवाई करीत आहे. - सुनील शिरापूरकर, साखर सहसंचालक, प्रादेशिक विभाग, सोलापूर
अधिक वाचा: e Pik Pahani : पीक पाहणी झाली आता सोपी; मोबाईल अॅपमध्ये केले 'हे' बदल, वाचा सविस्तर