शिरोळ : चालू गळीत हंगामात तुटणाऱ्या उसाला चार हजार रुपये पहिली उचल साखर कारखान्यांनी जाहीर करावी.
गतवर्षी तुटलेल्या उसाचा दुसरा हप्ता २०० रुपये दिल्याशिवाय कारखाने सुरू करू देणार नाही, असा इशारा आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी रविवारी येथे दिला.
शेतकऱ्यांनी, संघटनांनी मागणी केलेले दर कारखाने देणार नाहीत तोपर्यंत ऊसतोडी घ्यायच्या नाहीत, असे आवाहनही त्यांनी केले.
शिरोळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात 'आंदोलन अंकुश'ची एल्गार सभा झाली. या सभेत विविध दहा ठराव मंजूर करण्यात आले.
प्रारंभी शिवाजी तख्तातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा आणि महाराणी ताराराणी यांच्या गादीला अभिवादन करून सभेला सुरुवात झाली. स्वागत राकेश जगदाळे, तर प्रास्ताविक अक्षय पाटील यांनी केले.
चुडमुंगे म्हणाले, एफआरपीच्या दरात शेती परवडत नाही. कारखाने तेजीत चालले असतानासुद्धा शेतकऱ्यांच्या उसाला कमीत कमी दर दिला जात आहे, ते आम्हाला मान्य नाही.
साखर आणि उपपदार्थांना गेल्या वर्षभरात उच्चांकी दर मिळाले आहेत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसालाही उच्चांकी दर मिळाला पाहिजे.
कारखान्यांना झालेल्या नफ्यातील वाटा शेतकऱ्यांना दिल्याशिवाय उसाला कोयता लावू देणार नाही. चालू वर्षी पहिली उचल चार हजार रुपये जाहीर करावी. मगच कारखाने सुरू करावेत, असा इशारा चुडमुंगे यांनी दिला.
जिल्हा उपाध्यक्ष बंडू होगले म्हणाले की, ऊस दरासाठी आम्हाला नक्षलवादी बनायला लावू नका. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमची लढाई सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाध्यक्ष दीपक पाटील यांचे भाषण झाले. यावेळी कृष्णात देशमुख यांनीही मनोगत व्यक्त केले. नंदू सुतार यांनी सूत्रसंचालन केले. या सभेस आंदोलन अंकुशचे कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते.
एल्गार सभेतील ठराव
◼️ पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी एक नोव्हेंबरपूर्वी बैठक घेऊन ऊस दराबाबत तोडगा काढावा.
◼️ साखर कारखानदारीतून सरासरी वाहतूक पद्धतीला हद्दपार करावे.
◼️ शासनाने प्रतिटनाला लावलेली २७.५० रुपये वजावट रद्द करावी.
◼️ साखरेची एम.एस.पी. ४० रुपये करा.
◼️ ऊस तोडणी वाहतूक खर्च किलोमीटरच्या अंतरानुसार आकारण्यात यावा, या मागण्यांचा ठराव सभेत करण्यात आला.
एकत्र येऊन लढा द्यावा
◼️ ऊस दराच्या प्रश्नावर शेतकऱ्यांनी एकत्र येऊन लढा दिल्यास साखरसम्राटांना गुडघे टेकायला लावू शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शेवटपर्यंत लढत राहू आणि चांगला दर मिळवून घेऊ, असेही आवाहन धनाजी चुडमुंगे यांनी केले.
◼️ काटामारी होते तर वजनमापे विभाग काय करतो? असा प्रश्न करून याकडे लक्ष देण्याची प्रशासनाचीही जबाबदारी आहे, असे संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील यांनी सांगितले.
अधिक वाचा: यंदा सुकामेव्याची दिवाळी; तब्बल ९ हजार टन सुकामेव्याच्या विक्रीतून साडेपाचशे कोटींची उलाढाल
