सोलापूर : तसे उन्हाळ्यात जेमतेम पाणी असले, तरी धाडसाने द्राक्ष बागा जोपासणारा इथला शेतकरी यंदा धो-धो पडणाऱ्या सततच्या पावसाने रडकुंडीला आला आहे.
कारण, साखरेवाडीच्या वसंत साखरे यांची आठ एकर द्राक्ष बाग दहा दिवसांपासून पाण्यात आहे. साखरेवाडीच्या इतर २० एकर द्राक्षाची यापेक्षा वेगळी परिस्थिती नसल्याचे सांगण्यात आले.
साखरेवाडी हे गाव उत्तर सोलापूर तालुक्यातील टोकावरचे गाव. शेजारीच मोहोळ तालुक्यातील वाळूज-देगांवजवळ भोगावती नदी आहे. वरती कौठाळीचा साठवण तलाव ओसंडून वाहत आहे.
दररोजच्या पावसाने सांडवा वाहत आहे. साखरेवाडी हद्दीतील पाणी याच ठिकाणी ओढ्याला मिळते. ओढ्याला नदीचे स्वरूप आले आहे. यात वसंत साखरे यांची आठ एकर द्राक्ष बाग ही आठ दिवसांपासून पाण्यात आहे.
साखरेवाडी परिसरात बागायतीसाठी कायमस्वरूपी पाण्याची सोय नाही. त्यामुळे पावसाळ्यात जेमतेम पाण्यावर शेतकरी धाडसाने पीके घेतो. अलीकडच्या काही वर्षांत सलग व एवढा पाऊस पडत नाही.
यंदा मे महिन्यापासून पावासाची जोरदार बॅटिंग आहे. जून जुलैमध्ये जेमतेम मात्र ५ ऑगस्टपासून कोसळधारा पडत आहेत. जमिनीत एक थेंबही जिरत नसला, तरी दररोजच पाऊस पडत आहे.
याबाबत बोलताना वसंत साखरे म्हणाले, आठ दिवसांपासून आठ एकर द्राक्ष बाग पाण्यात आहे. एवढा मोठा व सलग पाऊस पडेल, असे वाटत नव्हते. असे पाणी कमी झाले वाटत असताना, पाऊस आलेला आहेच. त्यामुळे संपूर्ण १३ एकर द्राक्ष बाग खराब झाली आहे.
अशीच स्थिती जयसिंग क्षीरसागर कुटुंबाच्या १० एकर, महाबळेश्वर साखरे यांच्या चार, हरीदास क्षीरसागर, बाळासाहेब होनमुटे यांच्या प्रत्येकी दोन, पप्पू पवार यांच्या तीन एकर द्राक्ष बागेची झाली आहे.
पांढरी मुळी चालत नाही, काडीही बनत नाही..◼️ आता पाणी ओसरले, तरी पांढरी मुळी चालत नाही, काडी बनत नाही, त्यामुळे फलधारणा होण्याची शक्यता नसल्याचे जाणकार शेतकऱ्यांनी सांगितले. अशीच परिस्थिती उत्तर तालुक्यातील द्राक्ष बागांसह फळबागा व इतर पिकांचे आहे.◼️ ज्या पिकाला फलधारणा झाली आहे, अशाच पिकांचे नुकसानभरपाईसाठी पंचनामे करण्याचे आदेश आहेत. द्राक्ष बागा सध्या रिकाम्या आहेत. त्यामुळे नुकसानभरपाईसाठी पंचनामे करता येत नसल्याचे महसूल अधिकाऱ्यांनी सांगितले.
अधिक वाचा: शेतरस्ते होणार आता कायमचे अतिक्रमणमुक्त; प्रत्येक रस्त्यासाठी मिळणार विशिष्ट नंबर