२०२४-२५ गाळप हंगामासाठी प्रति टन २७५० चा भाव निश्चित करून त्यानुसार दसऱ्यापूर्वी तिसऱ्या हप्त्याची प्रति टन ७० प्रमाणे एकूण १०६ कोटी ६५ लाख रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करून पूर्णा सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.
कारखान्याच्या या भूमिकेमुळे नुकसानीत सापडलेल्या शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. पंधरा दिवसांपासून हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीसदृश पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नदी-ओढ्यांना पूर येऊन जीवित आणि वित्तहानी झाली आहे.
अशा संकटात सापडलेल्या आणि सण-उत्सवाच्या काळात शासनाच्या मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना पूर्णा साखर कारखाना प्रशासनाने तिसऱ्या हप्त्याची रक्कम देऊन मोठा आधार दिला आहे. पूर्णा सहकारी साखर कारखाना २०२५-२६ गाळप हंगामासाठी तयारी करत असून, ऑक्टोबर महिन्यात गाळपास सुरुवात होणार आहे.
गतवर्षीच्या गाळप उसाला प्रति टन २७५० रुपयांचा भाव निश्चित करण्यात आला होता. यापैकी आतापर्यंत शेतकऱ्यांना २६७० रुपये देण्यात आले होते. २५ सप्टेंबर रोजी ३ लाख ९९ हजार ४४२ मेट्रिक टन ऊस गाळपापोटी ७० रुपये प्रति टन प्रमाणे १०६ कोटी ६५ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
दसऱ्यासारख्या महत्त्वाच्या सणापूर्वी हा निधी खात्यावर जमा झाल्याने पूरग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांनी कारखाना प्रशासनाचे आभार मानले आहेत.
चौथा हप्ता दिवाळीपूर्वी जमा होणार
• कारखाना प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार दिवाळीपूर्वी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर चौथ्या हप्त्याची रक्कम जमा केली जाणार आहे.
• पूर्णा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक केशव आकुसकर म्हणाले, २०२५-२६ ऊस गाळप हंगामासाठी हंगामपूर्व कामाचे संपूर्ण नियोजन झाले असून, शासन निर्देशानुसार गाळप हंगाम सुरू करण्यात येईल.
• सध्या तिसऱ्या हप्त्यापोटी १०६ कोटी ६५ लाख रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आल्याची माहिती दिली.