वातावरणात बदल झाल्याने शेतीलादेखील फटका बसू लागला आहे. अलिबाग तालुक्यातील प्रसिद्ध तोंडली पीक अति उन्हामुळे धोक्यात आले आहे. तोंडली पिकाला कीड रोगाचा धोका निर्माण झाला असून, पाने पिवळी होत आहेत.
त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. यंदाच्या हंगामात तोंडलीच्या उत्पादनात ५० टक्के घट होण्याची भीती व्यक्त होत आहे.
अलिबाग तालुक्यात तोंडलीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. अलिबागची तोंडली ही मोठ-मोठ्या हॉटेलमध्ये दिली जातात. तालुक्यात तोंडलीचे क्षेत्र २३२.८० हेक्टर असून, सुमारे ९०० शेतकरी तोंडली उत्पादक आहेत.
पावसाळा संपल्यावर नोव्हेंबरच्या आठवड्यापासून दुसऱ्या तोंडलीच्या लागवडीला सुरुवात करण्यात येते. शेतात मांडव उभारून त्यातून उत्पादन मिळविण्याचा प्रयत्न शेतकरी करत असतात.
बाजारात जाडी व कळी अशा दोन प्रकारांमध्ये वेगवेगळ्या दराने तोंडली विकली जाते. जानेवारीपासून बाजारात तोंडली विक्रीला सुरुवात झाली आहे.
विदेशातही मागणी
सध्या जाडी तोंडली १६ रुपये किलो, तर कळी ३० ते ३२ रुपये किलोने विकली जात आहे. ही तोंडली मुंबई, वाशी बाजारातही पाठविली जात आहेत. पुण्याच्या बाजारात जाडी तोंडली १२० रुपये किलोने विकली जात आहे. तर, कळी तोंडलीला विदेशातही मागणी आहे.
येथे घातले जातात तोंडलीचे मांडव
अलिबाग तालुक्यात कार्ले, हाशिवरे, परहूर, बामणगाव, रेवस या परिसरात तोंडलीचे उत्पादन घेतले जात आहे. काही गावांमध्ये तोंडलीचे मांडव आहेत. तोंडलीला ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. यंदा जाडी तोंडली ६ रुपये व कळी ३० रुपये असे किलोमागे तोंडलीचे भाव आहेत. परंतु, ढगाळ वातावरणामुळे कीड रोगाचा धोका आहे, असे शेतकरी सतीश म्हात्रे यांनी सांगितले.
तोंडलीचे उत्पादन वाढले असून, मागणीही प्रचंड आहे. परंतु, दर कमी झाले आहेत. तोंडलीचे भाव कमी झाल्याचा फटका तोंडली उत्पादक शेतकऱ्यांना बसू लागला आहे. तोंडलीची पाने पिवळी पडू लागल्याने उत्पादन घटण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. - प्रभाकर नाईक, तोंडली उत्पादक शेतकरी.