आयुब मुल्ला
ठिबक सिंचनचे दीड वर्षात दोन टप्प्यात सुमारे १० कोटींपैकी ३ कोटी रुपयांचेच अनुदान जमा झाले आहे. याबाबत 'लोकमत अॅग्रो'ने वृत्त देऊन प्रशासनाला जागे केले होते.
याची दखल घेत तिसऱ्या टप्प्यात २ कोटी ४१ लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. आठवडाभरात किमान ६०० शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा होईल. तरीसुद्धा ८९० शेतकऱ्यांना पुन्हा प्रतीक्षा करावी लागणार आहे.
राष्ट्रीय कृषी सिंचन विकास योजनेतून केंद्र व राज्य सरकार ठिबकसाठी अनुदान देते. याबाबत जनजागृती केली जाते. या आवाहनाला कोल्हापूर जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळतो परंतु अनुदान वेळेत मिळत नाही.
अनुदानासाठी हेलपाटे...
२०२३-२४ मध्ये २४५० शेतकऱ्यांनी ठिबक बसविण्यासाठी स्वतःजवळील पैसे गुंतवले. अनुदानासाठी मात्र हेलपाटे मारावे लागले. सुरुवातीच्या टप्प्यात २ कोटी २७ लाख, तर दुसरा टप्पा ५५ लाख रुपयांचा आला.
नव्या लाभार्थ्यांची निवडच नाही...
ठिबक बसवलेल्या बहुतांश शेतकऱ्यांना थकीत अनुदानाची रक्कम देणे शक्य झालेले नाही. मार्च महिना तोंडावर आला आहे. राज्यातही अशीच स्थिती आहे. अशावेळी चालू वर्षात ठिबक बसवणाऱ्या नवीन लाभार्थ्यांची निवडच करण्यात आलेली नाही. अनुदान थकीत असल्याचा फटका नवीन लाभार्थ्यांना बसला आहे.
ठिबक सिंचनमुळे उत्पादनात वाढ होते. पाण्याची बचत होते. या योजेनेचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वेळेत जमा झाले पाहिजे. - विजय रंगराव पाटील, शेतकरी, लाटवडे जि. कोल्हापूर.
तालुकानिहाय अनुदान न मिळालेले शेतकरी
हातकणंगले - ५१४
शिरोळ - २८९
पन्हाळा - २२५
कागल - १३६
(उर्वरित तालुक्यात ठिबक सिंचन करण्याचे प्रमाण कमी आहे.)