दत्ता पाटीलफोंड्या माळरानावर जिथे कुसळे उगवत होती, अशा ठिकाणी सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या हिमतीने द्राक्ष बागा फुलवण्याची किमया केली.
या द्राक्षबागांनी सांगली जिल्ह्यातील तासगाव, कवठेमहांकाळ, पलूस, मिरज, खानापूर, जत तालुक्यांचा आर्थिक स्थर उंचावला, याच द्राक्ष इंडस्ट्रीजच्या माध्यमातून प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष लाखो हातांना रोजगार मिळाला; मात्र याच द्राक्ष इंडस्ट्रीला सलग चार वर्षांपासून अस्मानी संकटांचे ग्रहण लागले आहे.
द्राक्षे गोड असली तरी या द्राक्षाची कहाणी आता कडू झाली आहे. अवकाळीने द्राक्ष बागांना चार वर्षांत ९ हजार कोटींचा फटका बसला आहे. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था केविलवाणी झाली आहे.
कमी पाण्यात जास्त उत्पन्न देणारे पीक म्हणून द्राक्ष बागांची ओळख निर्माण झाली. अनेक प्रयोगशील शेतकऱ्यांनी स्वतःच्या हिमतीवर नवनवीन शोध लावून द्राक्षबागा फुलवल्या.
अगदी माळरानावर जिथे कुसळंही पिकत नव्हती, अशा ठिकाणी द्राक्षबागा फुलवल्या, सांगली जिल्हा द्राक्षमय झाला. किंबहुना राज्य, देश आणि देशाबाहेरही सांगलीची ओळख द्राक्ष पंढरी म्हणून झाली.
हा इतिहास असला तरी, गेल्या चार वर्षांतील द्राक्षाची परिस्थिती पाहिल्यास, एकीकडे वाढत जाणारा उत्पादनाचा खर्च आणि दुसरीकडे द्राक्षाच्या जैसे थे असलेल्या किमती. त्यातच भरीस भर म्हणून सातत्याने अवकाळी पावसाने होणारे नुकसान. यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे.
ज्या द्राक्ष इंडस्ट्रीने जिल्ह्याला ओळख दिली. तीच द्राक्ष इंडस्ट्री धोक्यात आली आहे. सलग चार वर्षात अवकाळी पावसामुळे तब्बल ९००० कोटी रुपयांचा फटका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना सहन करावा लागला आहे.
यंदाही अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यावर्षी सलग चार महिने पाऊस राहिल्यामुळे द्राक्ष उत्पादनच कमी झाले होते. फळ छाटणीनंतर तब्बल ३० टक्के द्राक्षचागा घड निर्मिती नसल्याने वांझ गेल्या आहेत.
त्यातच अवकाळीच्या फटक्यामुळे उरल्या सुरल्या द्राक्षबागांनाही घडकुजीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे यावर्षी पहिल्यांदाच मागील चार वर्षाच्या तुलनेत सर्वाधिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे.
बागांसाठी लाखोंचा खर्च; उत्पन्न मात्र तुटपुंजे• जिल्ह्यातील एकूण दाक्षबागांचे क्षेत्र ८० हजार एकरवर आहे.• नुकसानग्रस्त दाक्षबागांचे अंदाजित क्षेत्र ६५ हजार एकर आहे.• एक एकर दाक्षबाग पिकवण्यासाठी औषधे व मजुरीवर वर्षभरात सरासरी तीन ते चार लाख खर्च होतो.• एक एकरातून द्राक्षबागेतून मिळणारे सरासरी उत्पन्न १५ टन.
मागील चार वर्षातील नुकसानीवर एक नजर२०२१ साली २४०० कोटी अंदाजे नुकसान ६० हजार एकर नुकसानग्रस्त क्षेत्र.२०२२ साली १६०० कोटी अंदाजे नुकसान ४० हजार एकर नुकसानग्रस्त क्षेत्र.२०२३ साली २२०० कोटी अंदाजे नुकसान ५६ हजार एकर नुकसानग्रस्त क्षेत्र.यंदा २६०० कोटी अंदाजे नुकसान ६५ हजार एकर नुकसानग्रस्त क्षेत्र.
दरवर्षी द्राक्षबागा उद्ध्वस्त ● यावर्षी मे महिन्यापासून सलग चार महिने पावसाळाच होता. त्यामुळे द्राक्ष बागेच्या काडीची पक्चता झाली नाही.● द्राक्षांची गर्भधारणा झाली नाही. त्यामुळे द्राक्ष निर्मिती न झालेल्या द्राक्ष बागांचे प्रमाण ३० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. ३० टक्के द्राक्ष बागात सरासरीच्या निम्मे देखील घड नाहीत.● दुसरीकडे पावसाने आगाप फळ छाटणी केलेल्या द्राक्षबागेतील द्राक्षे मऊ पडलेली आहेत.● काढणीसाठी अंतिम टप्प्यातील बागा, ऑक्टोबर महिन्यात फळ छाटणी केलेल्या फुलोरा अवस्थेतील द्राक्षबागा, द्राक्ष हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात फळ छाटणी केलेल्या, पोंगा अवस्थेतील असलेल्या द्राक्षबागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत.
अधिक वाचा: E-Peek Pahani : नवीन ई-पीक पाहणी DCS मोबाईल अॅपमध्ये कशी कराल पीक पाहणी? वाचा सविस्तर