घाटनांद्रे : कवठेमहांकाळ तालुक्यातील द्राक्ष हंगाम हा अगदी अंतिम टप्प्यात आला असून, उर्वरित द्राक्ष मालही देण्याचीही बळीराजाची गडबडघाई सुरू आहे.
या द्राक्ष हंगामानंतर आता द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना छाटणीसाठीही मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. संपूर्ण तालुक्यात द्राक्ष पिकाचे सुमारे ३७८३७६ हेक्टर इतके द्राक्ष क्षेत्र आहे.
केवळ घाटमाथ्यावरील म्हणजे घाटनांद्रे, तिसंगी, गर्जेवाडी, कुंडलापूर, जाखापूर व कुची परिसरातच ४४५.९० इतके द्राक्ष पिकाचे क्षेत्र आहे.
सध्या व्यापारी व दलाल यांच्याकडून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची होणारी फसवणूक, मिळणारा कमी दर यामुळे अनेक शेतकऱ्यांनी बेदाणा निर्मितीकडेच लक्ष केंद्रित केले आहे.
यावर्षी द्राक्ष हंगामातील आर्थिक ताळेबंद बसवून शेतकरी सावरतोय तोच छाटणीसाठी शेतकऱ्यांना एकरी सुमारे २५ हजार रुपयांपर्यंत पैसे मोजावे लागणार आहेत.
सध्याचा द्राक्ष छाटणीचा एकरी दर पुढीलप्रमाणे
छाटणीस - ५,०००
पेस्ट लावणे - ३,०००
काडी निरळणे - ४,०००
पहिले सबकेन - २,५००
शेंडा मारणे - २,०००
पहिला खुडा - ३,०००
दुसरा खुडा - ३,०००
तिसरा खुडा - २,५००
असा एकूण २४,५०० रुपये एक एकर बाग छाटणीसाठी खर्च येत आहे.
अधिक वाचा: भविष्यात कांद्याला चांगला दर पाहिजे असेल तर साठवणुकीपूर्वी व साठवणुकीत करा हे उपाय