Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिकूल परिस्थितीतही या जिल्ह्याने केले राज्यात सर्वात जास्त उसाचे गाळप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 13:23 IST

जानेवारीनंतरचा कडक उन्हाळा, त्यानंतर लांबलेल्या व थांबलेल्या पावसामुळे उसाची वाढच थांबली. अशातही राज्यात ऊस गाळपात हा जिल्हा नंबर-१ ठरला आहे.

अरुण बारसकरसोलापूर : जानेवारीनंतरचा कडक उन्हाळा, त्यानंतर लांबलेल्या व थांबलेल्या पावसामुळे उसाची वाढच थांबली. अशातही राज्यात ऊस गाळपात सोलापूर जिल्हा नंबर-१ ठरला आहे. असे असले तरी जिल्ह्यातील तब्बल ३१ साखर कारखान्यांचा उतारा १० टक्क्यांच्या आत आहे. विशेष म्हणजे, तीन कारखान्यांचा साखर उतारा ८ टक्क्यांपेक्षा कमी आहे.

सर्वाधिक पाणी मागणारे पीक म्हणून ऊस आहे. उसाला पाणी अधिक लागत असले तरी जिल्ह्याचे प्रमुख पीक ऊस आहे. मात्र, हाच ऊस यंदा शेतकऱ्यांना कमालीचा अडचणीत आणला आहे. मागील जानेवारीनंतर (२०२३) जिल्ह्यात कडक उन्हाळा सुरू झाला.

वाढलेल्या उन्हाचा फटका सर्वच पिकांना बसला तसा उसावरही परिणाम झाला. पावसाळ्यात जून महिना बे-भरवशाचा ठरला. जुलै महिन्यात सरासरी इतका पाऊस पडला; मात्र त्यामुळे उसाची तहान भागली नव्हती. पुन्हा ऑगस्टनंतर पाऊस थांबला तो थांबलाच. त्याचा परिणाम ऊस वाढीवर व वजनावर झाला.

अशातही जिल्ह्यात ३६ साखर कारखान्यांनी यंदा गाळप हंगाम घेतला. आतापर्यंत ३१ साखर कारखान्यांचा पट्टा पडला असून, मंगळवारी तीन कारखाने बंद होणार असल्याचे सांगण्यात आले. सिद्धेश्वर व विठ्ठलराव शिंदे पिंपळनेर हे दोन कारखाने चार दिवसांत बंद होतील, असे सांगण्यात आले.

सोलापूर जिल्ह्याचे ऊस गाळप राज्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे कोल्हापूर जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. गाळपात आघाडीवर असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांचा साखर उतारा मात्र कमालीचा विचार करण्यास भाग पाडणारा आहे. तब्बल ३१ कारखान्यांचा साखर उतारा १० टक्क्यांपेक्षा कमी आहे.

जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे गाळप- लोकमंगल भंडारकवठेचा साखर उतारा ७.८३ टक्के, जकराया शुगर ७.३४ टक्के तर संत कुर्मदासचा उतारा ७.१ टक्के इतकाच पडला आहे.- ९ टक्क्यांच्या आत साखर उतारा १३ तर १० टक्क्यांपेक्षा कमी साखर उतारा १५ कारखान्यांचा पडला आहे.- पांडुरंग श्रीपूरचा साखर उतारा जिल्ह्यात सर्वाधिक १०.८७ टक्के, बबनराव शिंदे पिंपळनेरचा उतारा १०, ७९ टक्के, विठ्ठलराव शिंदे करकंबचा उतारा १०.५८ टक्के, विठ्ठल पंढरपूरचा उतारा १०.३२ टक्के तर संत दामाजी कारखान्याचा साखर उतारा १०.१९ टक्के इतकाच आहे.- सोलापूर जिल्ह्याचे ऊस गाळप एक कोटी ६२ लाख ५४ हजार इतके झाले असून, एक कोटी ६३ लाख मेट्रिक टन होईल, असा अंदाज आहे. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याचे गाळप एक कोटी ५१ लाख मेट्रिक टन इतके झाले आहे.

टॅग्स :साखर कारखानेऊसशेतकरीसोलापूरमहाराष्ट्रपीकपाऊस