बाळासाहेब काकडे
श्रीगोंदा : निसर्गातील असमोल, वाढते तापमान, कमी झालेली जंगल क्षेत्र व कीटकनाशक व तणनाशकांच्या अतिवापरामुळे मधमाशांची संख्या लक्षणीय घटली आहे.
त्याचा फळे, पीक उत्पादनावर गंभीर परिणाम झाला आहे. कृत्रिम मधमाशा आणून शेती करावी लागत असून, मधमाशांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मधमाशी पालन व्यवसायास 'अच्छे दिन' आले आहेत.
मधमाशी म्हणजे परागण आणि मध निर्मितीमधला अत्यंत महत्त्वाची घटक. राणी माशी, कामकरी आणि नर माशांच्या स्वरूपात पोळ्यात राहते.
फुले, वनस्पतींचे परागण करून फळे व भाज्यांच्या वाढीस मदत करते. तसेच मध व मैण देते. हल्ली मधमाशीपालन हा एक चांगला व्यवसाय असून, मधमाशांमुळे पिकांची गुणवत्ता सुधारते.
श्रीगोंदा तालुक्यात शेतीचे आधुनिकरण त तणनाशक, रासायनिक खतांच्या वापरामुळे मध्धमाशी संवर्धनावर गंभीर परिणाम झाला आहे.
मधमाशांची संख्या घटल्याने लिंबू उत्पादनात घट झाली, परिणामी शेतकरी डाळिंब व पेरू उत्पादनाकडे वळले. आता ही पिकेही धोक्यात आली आहेत.
मधमाश्या घटल्याने एकूण शेतीचे गणितच बिघडले आहे. आता परागीकरण होण्यासाठी शेतकरी कृत्रिम मधमाशांच्या पेटवा फळबागेत आणून ठेवत आहेत.
अशा मधमाशांना मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याने मधमाशांच्या एका पेटीची किंमत पाच हजारांच्या घरात पोहोचली आहे. एकरी दोन तीन पेटचा ठेवाव्या लागतात. मधमाशांना हवामान मानवले नाही, तर त्याही मरतात, ही वस्तुस्थिती आहे.
पोळ्यामध्ये राणी माशी (नवीन अंडी घालते), कामकरी माशा (अमृत गोळा करणे, पोळे सांभाळणे) व नर माशा (राणी माशीचे फलन करणे) असतात. मेणाचे पोळे बनवून त्यात मध साठवतात, जे हजारो माशांचे घर असते.
मधात व्हिटॅमिन्स, एन्झाईम्स व अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असून, घसा दुखी, खोकला कमी करते, रोगप्रतिकारशक्ती वाढवते, रक्त शुद्ध करते. मधमाशांमुळे पिकांची गुणवत्ता आणि प्रमाण वाढते.
लिंबू उत्पादन घटल्याने बाग काढली. आता डाळिंब लावली. आता डाळिंब शेतीचीही तीच अवस्था असून, कृत्रिम मधमाशांच्या पेटवा आणून शेती करावी लागत आहे. - शरद जमदाडे, आवळगाव
मधमाशांचे संवर्धन होण्यासाठी तणनाशक, कीटकनाशक व रासायनिक खतांचा वापर टाळला पाहिजे. शेतीच्या बांधावर झाडे ठेवली पाहिजेत. त्यासाठी बांधाचे रुंदीकरण आवश्यक आहे. मधमाशीविना शेती करणे शक्य नाही. - क्रांती चौधरी, तालुका कृषी अधिकारी
अधिक वाचा: मंगळवेढ्याची मालदांडी थेट लंडनला रवाना; अवघ्या २० किलो ज्वारीसाठी केले १८ हजार रुपये खर्च
