Join us

Crops : सिद्धेश्वर धरणाच्या पाण्यावर बहरला फळबागांसह भाजीपाल्याचा मळा वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 16:46 IST

Crops : फेब्रुवारी महिन्यापासून तापमानाचा पारा वाढू लागल्यामुळे यावर्षी सिद्धेश्वर धरणाचे पाणी कमी मिळेल, असे शेतकऱ्यांना वाटत होते; परंतु सिद्धेश्वर धरणाचे (Siddheshwar Dam) पाणी कॅनॉलद्वारे ठरवून दिलेल्या रोटेशनप्रमाणे मिळत आहे. त्यामुळे परिसरातील शेतशिवार उन्हाळ्यातही हिरवागार दिसू लागला आहे. (Vegetable gardens)

अरुण चव्हाण

फेब्रुवारी महिन्यापासून तापमानाचा पारा वाढू लागल्यामुळे यावर्षी सिद्धेश्वर धरणाचेपाणी कमी मिळेल, असे शेतकऱ्यांना वाटत होते; परंतु सिद्धेश्वर धरणाचेपाणी (Siddheshwar Dam) कॅनॉलद्वारे ठरवून दिलेल्या रोटेशनप्रमाणे मिळत आहे. त्यामुळे परिसरातील शेतशिवार उन्हाळ्यातही हिरवागार दिसू लागला आहे. (Vegetable gardens)

मागील जून व जुलै महिन्यांत जोरदार पाऊस झाला. त्यामुळे यावर्षी नदी, विहीर, तलाव तुडुंब भरले गेले. फेब्रुवारी महिन्यापर्यंत विहीर व बोअरची पाणीपातळी खोल गेली नाही; परंतु मार्च महिना जसा सुरू झाला तशी पाणीपातळी खोल जाणे सुरू झाले.

औंढा तालुक्यातील जवळाबाजार, आडगाव (रंजे, तपोवन, नालेगाव, पोटा, असोला, कळंबा, गुंडा, बोरी, आजरसोंडा आदी गावांतील शेतशिवारांना सिद्धेश्वर धरणाचे पाणी मिळते. त्यामुळे शेतकरी टरबूज, खरबूज, उन्हाळी सोयाबीन, उन्हाळी भूईमूग, भाजीपाला आदी पिके घेताना दिसत आहेत. (Crops)

सिद्धेश्वर धरण पाण्याच्या भरवशावर यावर्षीही शेतकऱ्यांनी केळी, ऊस या पिकांबरोबर उन्हाळी पिकेही घेतली आहेत. सद्यः स्थितीत उन्हाच्या पाऱ्याने चाळिशी पार केली असली तरी उन्हाळी पिके मात्र बहरलेली पाहावयास मिळत आहेत. त्यामुळे शेतकरीवर्ग सध्यातरी आनंदी दिसून येत आहे. मे महिन्यापर्यंत धरण प्रशासनाने अशीच साथ द्यावी, अशी मागणीही शेतकरी करत आहेत. (Vegetable gardens)

काही ठिकाणी होतो पाण्याचा अपव्यय

* कॅनॉलमार्फत जवळाबाजार व परिसरातील शेत-शिवारात पाणी मिळते; परंतु काही ठिकाणी कॅनॉलच्या चाऱ्यांमध्ये झाडे, झुडपे वाढली असून काही ठिकाणी चाऱ्या फुटल्या आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी पाण्याचा अपव्यय होतो आहे.

* तेव्हा कॅनॉल प्रशासनाने याची दखल घेऊन चाऱ्यांची साफसफाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

अवकाळी पाऊस, वादळाची घेतली धास्ती

* पंधरा दिवसांपासून दुपारच्या वेळी अवकाळी व वादळवारे हजेरी लावत आहेत.

* या वादळात उन्हाळी पिकांचे नुकसान होईल, अशी भीती शेतकऱ्यांना आहे.

* जी पिके काढायला आली आहेत, अशा पिकांची काढणी अवकाळी पावसाच्या भीतीमुळे शेतकरी लगबगीने करू लागला आहे.

पाण्यामध्ये खंड पडू देऊ नये

* सिद्धेश्वर धरण प्रशासनाने रोटेशनप्रमाणे रब्बी हंगामात भरपूर पाणी दिले. सध्या उन्हाळी हंगाम सुरू असून मे महिन्यापर्यंत पाण्यामध्ये खंडू पडू देऊ नये.

* या पाण्याच्या भरवशावर अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी पिके घेतली आहेत. पाण्यामध्ये खंड केला तर अवाढव्य खर्च केलेली पिके कोमेजून जातील. तेव्हा रोटेशनप्रमाणे पिकांना पाणी द्यावे, अशी मागणी के. जी. राखोंडे (आजरसोंडा), सुरेश चव्हाण आडगाव (रंजे) या शेतकऱ्यांनी केली आहे.

हे ही वाचा सविस्तर : Kashmiri Apple Farming : मराठवाड्यातील खडकाळ माळरानावर गजाननरावांनी फुलविली सफरचंदाची बाग वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीधरणपाणीपीकभाज्याफळेहिंगोली