सोलापूर : सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी व महापुरामुळे जिल्ह्यातील सात लाख ६४ हजार १७३ शेतकऱ्यांच्या सहा लाख चार हजार ६४१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे, यासाठी ८६७ कोटी ३८ लाख रुपयांची शासनाकडे मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, खरडून गेलेल्या जमिनीचा वेगळा अहवाल तयार करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. सप्टेंबर महिन्यातील ही नुकसानभरपाई तीन हेक्टरप्रमाणे आहे. जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी व महापूर आला होता.
त्यामध्ये प्रामुख्याने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पीक नुकसान पंचनामे पूर्ण झाल्याने त्याचे अहवाल तहसीलदार कार्यालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला आले आहेत.
आता सप्टेंबर महिन्यात झालेल्या पीक नुकसानीची अंतिम आकडेवारी झाल्याने निधी मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
जिरायत दोन लाख ५६ हजार २४९ शेतकऱ्यांच्या दोन लाख ५७ हजार ५९२ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असून, त्यासाठी २१८ कोटी २५ लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे.
बागायती तीन लाख ७० हजार १८९ शेतकऱ्यांच्या दोन लाख चाळीस हजार ७९४ हेक्टर पिकांचे नुकसान झाले. त्याची भरपाई ४०९ कोटी ३५ लाख रुपये.
फळपिके एक लाख ३७ हजार ७३५ शेतकऱ्यांचे एक लाख सहा हजार २५३ हेक्टर पिकांचे नुकसान तर त्यासाठी २३९ कोटी ७ लाख रुपये अशी ८६७ कोटी ३८ लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे.
वाढीव रकमेचा प्रस्ताव..
◼️ ऑगस्ट महिन्यात झालेल्या पीक नुकसानीची मंजूर रक्कम दोन हेक्टरपर्यंतची आहे.
◼️ आता नव्याने एक हेक्टरप्रमाणे पात्र हेक्टरप्रमाणे रक्कम मागणी करावी, असे पत्र शासनाकडून आले असून, जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने तालुका कृषी कार्यालयाला निधी मागणीचा प्रस्ताव मागितला आहे.
◼️ वाढीव हेक्टरी दहा हजार रुपये शासन देणार असून, ती रक्कम मागणीचा प्रस्ताव तयार करण्याचे काम कृषी विभाग करीत असल्याचे सांगण्यात आले.
अधिक वाचा: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या मदत पॅकेजचे नवीन अपडेट आले; वाचा सविस्तर