परतीच्या पावसाचा कहर त्यात कापसावर लाल्या व मर रोगाचे आक्रमण झाल्याने कपाशी वेळेआधीच लाल पडल्याने झाडावरील पक्व झालेली बोंडे फुटून मोकळी झाली. त्यामुळे डिसेंबर ते जानेवारीपर्यंत चालणारा कापसाचा हंगाम ऑक्टोबर महिन्यातच संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांसासाठी केलेला खर्चही निघणार नाही.
गेल्या काही वर्षांपासून अतिवृष्टी, रोगराई व नैसर्गिक आपत्तीत बळीराजा भरडला जात असतानाच कोणत्याच पिकाला भावाची जोड मिळत नसल्याने शेती हा व्यवसाय परवडणारा नसल्याने अनेकांनी या व्यवसायातून अंग काढणे सुरु केले आहे. यावर्षी तर खरीप हंगामाला पावसाने चांगलेच झोडपले असल्याने सर्व पिकांची ऐन काढणी काळात माती झाली आहे.
सध्या कापसाची सर्व बोन्डे सडली असून ती मजूरांकरवी काढण्याची कसरत पाहता एक मजूर दिवसभरात केवळ १० ते १५ किलो कापूस वेचत असून त्यासाठी अर्ध्या दिवसाचे ३०० रुपये मजुरी शेतकऱ्यांना द्यावी लागत आहे. हाच कापूसबाजारपेठेत चिल्लर किमतीत ५ ते ६ हजार रुपये क्विंटल जात आहे. त्यामुळे या कवडीमोल भावात कापूस विकून शेतकऱ्यांचा वर्षभराचा बजेट कसा सावरणार? असा सवाल कापूस उत्पादक शेतकऱ्यांमधून करण्यात येत आहे.
खर्च वारेमाप; भावाचा ताळेबंद बसेना..
• गेल्या काही वर्षांपासून बियाणे, कीटकनाशके, रासायनिक खते सोबतच मजुरीचेही भाव दिवसेंदिवस वाढत आहे.
• मात्र तीनचार वर्षांपूर्वी प्रतिक्विंटल १२ हजार पार झालेला हा चांगला कापूस आजरोजी कवडीमोल किमतीत खरेदी करून शासन शेतकऱ्याची बोळवण करत आहे.
• खासगी व्यापारी तर ओलाव्याचे कारण समोर करून, शेतकऱ्यांची गरज ओळखून केवळ ५ ते ६ हजार रुपये प्रतिक्विंटलने कापसाची खरेदी करून एकप्रकारे त्यांची थट्टा करत आहेत.
बाजारात कापसाला ५ ते ६ हजारांचा मिळतोय भाव
सततच्या पावसामुळे कापसावर लाल्या व मर रोगाचे आक्रमण झाल्याने २५ ते ३० कैऱ्या झाडाला पक्क्या झाल्या असल्या तरी त्यातील निम्म्यापेक्षा अधिक कैऱ्या या झाडावर सडल्या आहेत. हा कापूस वेचणी करण्यासाठी खर्च जास्त येत आहे. त्यात हंगाम वेळेआधीच संपण्याच्या मार्गावर असल्यामुळे उत्पन्नात निम्म्याने घट येणार असून त्यामुळे शेतकरी कोलमडणार आहे. - उत्तमराव शामराव देवरे, शेतकरी, महिंदळे ता. भडगाव जि. जळगाव.