सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा कलमांना मोहोर येण्यास सुरुवात झाली आहे. यावर्षी उष्ण दमट वातावरणामुळे पहिल्या टप्प्यातील मोहोर येण्यास सुमारे एक महिना विलंब झाला आहे. सध्या बहुतांश कलमांना मोहोर, तर काही कलमांना पालवी येत आहे. हापूस हा संवेदनशील आंबा प्रकार असल्याने तापमान, पाऊस आणि थंडीतील लहान बदलांचाही मोठा फटका उत्पादनाला बसतो.
हवामान बदलामुळे हापूस आंब्याचे उत्पादन, गुणवत्ता आणि हंगामाचे वेळापत्रक तिन्ही पातळ्यांवर बिघडत आहे. याचा थेट आर्थिक फटका कोकणातील बागायतदार आणि आंबा व्यवसायाला बसत आहे. यावर्षी पाऊस लांबल्यामुळे आंबा कलमांना पहिल्या टप्प्यातील मोहोर, जो सामान्यतः ऑक्टोबर अखेरीस येतो, तो नोव्हेंबर अखेरीस आला आहे.
तब्बल एक महिना आंबा हंगाम उशिरा होणार आहे. बहुतांश कलमांची पालवी आंबा मोहोर येण्यास पोषक होती, मात्र गुलाबी थंडी व पोषक वातावरण निर्माण होत नसल्याने कलमांना मोहोर लागत नव्हता. नोव्हेंबर अखेरीस बहुतांश कलमांना मोहोर येण्यास सुरुवात झाली आहे.
कधी थंडी, तर कधी उष्णता आणि लांबलेला पाऊस असे बदलत जाणारे वातावरण असल्याने पहिल्या टप्प्यातील मोहोर येण्यास तब्बल एक महिना विलंब झाला आहे. सध्या जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी कमीअधिक प्रमाणात थंडी पडत आहे. येथील बागायतदार दरवर्षी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आलेल्या संकटांना सामोरे जात आहेत.
आंबा बागायतदार आंबा कलमांना कीटकनाशक फवारणी करण्यात मग्न आहेत. फळधारणा कमी झाल्यास किंवा अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर कोणती उपाययोजना करावी, तसेच कीटकनाशक फवारणी कशा पद्धतीने करावी, याचा अभ्यास केला आहे. आता आंबा बागायतदार थंडी पडायला लागल्याने सुखावले असताना पुन्हा ढगाळ हवामानामुळे धास्तावलेले दिसत आहेत.
सुपारी बागायतदार ढगाळ हवामानाने पिकाची प्रतवारी घसरू शकते, या चिंतेत दिसत आहेत. डिसेंबर, जानेवारीत लागणारी हलकी, सलग थंडी कमी होत असल्याने मोहोर कमी येतो किवा असमान येतो. त्यामुळे नंतर लागणाऱ्या फळांची संख्या घटते. अवकाळी पावसामुळे आणि अचानक तापमान बदलामुळे मोहोर तीन तीन वेळा गळून जाण्याच्या घटना नोंदविण्यात आल्या असून उत्पादन काही भागात ३० ते ४० टक्क्यांपर्यंत घसरल्याचे सांगितेले जात आहे.
४० हजार हेक्टरवर आंबा लागवड
जिल्ह्यात सुमारे ४० हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर आंबा लागवड करण्यात आली आहे. येथे हजारो आंबा बागायतदार आहेत. दुसऱ्या टप्यातील मोहोर १५ डिसेंबरनंतर कलमांना येऊ शकतो, असा अंदाज बागायतदार आणि शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
९० टक्के पोषक वातावरण
कलमांना मोहोरसाठी पोषक वातावरण आहे. गतवर्षी दुसऱ्या टप्प्यात मोहोराला अल्प प्रमाणात फळधारणा झाली होती.
योग्य फवारणी करण्याची गरज
सध्या आंबा कलमांना मोठ्या प्रमाणात मोहोर येत आहे. हा मोहोर टिकविण्यासाठी कीटकनाशक फवारणी करणे आवश्यक आहे. बदलत्या हवामानात आंबा पीक टिकविणे कठीण असले तरी योग्य पद्धतीने फवारणी केल्यास आंबा उत्पादन टिकवून ठेवता येईल.
उष्णतेची लाट आणि पावसातील बिघाड
वाढती उष्णतेची लाट फुलो-यावर ताण आणते. परागणावर परिणाम करते आणि झाडांवर उष्णता ताण वाढवते. त्यामुळे फळ गळ, आकार लहान राहणे आणि डाग आदी समस्या वाढतात. लांबलेला किंवा उशिरा येणारा पावसाळा आणि हंगामात येणारा अवकाळी पाऊस यामुळे फळावर बुरशी, कुज तसेच फळ बाजारात दोन महिने उशिरा येण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
उत्पादन आणि बाजारावर परिणाम
• मागील काही वर्षात कोकणात प्रत्यक्ष बाजारात येणारे हापूसचे उत्पादन केवळ १५ ते २० टक्क्यांपर्यंत राहिल्याच्या नोंदी आहेत. तर इतर वर्षांतही १५ ते २० टक्क्यांपर्यंत उत्पादन होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
• उत्पादन घटल्याने त्याचा व्यापारावर परिणाम होतो. दर्जेदार माल कमी मिळतो. दर जास्त कभी अशा चढ-उतारामुळे शेतकरी, व्यापारी आणि ग्राहक तिन्ही घटकांवर आर्थिक धोका वाढतो.
महेश सरनाईक
उपमुख्य उपसंपादक सिंधुदुर्ग
