बोर्डी : पंतप्रधान फळपीक विमा योजनेत पालघर जिल्ह्यातील चिकू उत्पादकांच्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांनी मंत्रालयात बैठक घेतली.
यावेळी चिकू विम्याचे सर्व अर्ज एका आठवड्यात निकाली काढण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीत आमदार मनीषा चौधरी यांनी चिकू संशोधन केंद्र स्थापन करण्याची आणि अवकाळी पावसामुळे भात पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी केली.
या बैठकीत नॉर्थ कोकण चेंबर ऑफ कॉमर्स अँड अॅग्रिकल्चरचे अध्यक्ष निमिष सावे व पदाधिकारी, पालघर जिल्ह्यातील कृषी संस्था प्रतिनिधी, आणि शेतकरी प्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या.
कृषिमंत्र्यांनी चिकू विम्याचे सर्व अर्ज एका आठवड्यात निकाली काढण्याचे निर्देश दिले. त्यानंतर कृषी विभागाने बजाज अलायन्स विमा कंपनीस सर्व अर्जाची पुनर्तपासणी करून पात्र शेतकऱ्यांना तत्काळ विमा लाभमंजूर करण्याचे निर्देश दिले आहेत.
विमा समस्या मार्गी लावण्यासाठी ठोस उपाययोजना ठरविण्यात आल्याने सकारात्मक चर्चा झाल्याचे निमिष सावे म्हणाले. कृषीमंत्र्यांनी पीकविमासाठी कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
विविध कारणांमुळे २७६ अर्ज राहिले प्रलंबित
◼️ पालघर जिल्ह्यातील चिकू हे प्रमुख बागायती फळपीक असून, यंदाच्या मृगबहारासाठी तीन हजार ४५५ चिकू लागवडीसाठी पंतप्रधान फळपीक योजनेत चार हजार २१ शेतकऱ्यांनी विमा हप्ता भरला.
◼️ त्यापैकी एक हजार ४८९ अर्जामध्ये विसंगती आढळल्यावर तपासणीनंतर एक हजार २१३ अर्ज मंजूर होऊन २७६ अर्ज प्रलंबित आहेत.
◼️ विमा अर्ज प्रक्रियेत तांत्रिक त्रुटी, अपूर्ण दस्तऐवज किंवा डेटा अपलोड संदर्भातील समस्यांमुळे विमा कंपन्यांनी अर्ज 'अवैध' तथा 'अपूर्ण' म्हणून परत पाठविल्याचे निदर्शनास आले.
चिकू उत्पादकांना अधिक साहाय्य मिळावे
◼️ मंत्रालयातील बैठकीत आमदार मनीषा चौधरी यांनी कृषीमंत्र्यांसमोर पालघर जिल्ह्यातील गरीब शेतकऱ्यांच्या हितासाठी ठामपणे भूमिका मांडली.
◼️ चिकू उत्पादकांना संशोधन व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक साहाय्य मिळावे, यासाठी चिकू संशोधन केंद्र स्थापन करण्याची मागणी त्यांनी कृषिमंत्र्यांकडे केली.
◼️ याशिवाय अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करा, अशी मागणी आ. चौथरी यांनी केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात परतीच्या पावसाने भातपिकाच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
