जून ते सप्टेंबर हे पावसाळ्याचे चार महिने. पण, यंदा पावसाने मे महिन्याच्या मध्यावरच आगमन केले. त्यामुळे सप्टेंबरच्या मध्यावर किंवा किमान सप्टेंबरच्या अखेरीस तो आपले चंबू गबाळे आवरेल, अशी अटकळ बांधली जात होती. पण, आता नोव्हेंबर सुरू झाला, तरी काळ्या ढगांनी आपली पाठ सोडलेली नाही.
ऑक्टोबरमध्ये जेव्हा उन्हाचा तडाखा अपेक्षित होता, तेव्हा पाऊस कोसळायचा थांबत नव्हता. थंडीची चाहूल लागण्याच्या काळातही कधी मुसळधार पाऊस, तर कधी प्रखर ऊन असा अनुभव येत आहे. हा बदल यंदाच जाणवत नाही. गेली अनेक वर्षे हळूहळू हे बदल होत आहेत. कही बदल लक्षात येण्याजोगे आहेत, तर काही बदल खूप संथपणे नकळत होत आहेत.
लहानपणी दिवाळीत पहाटे अतिथंडी असायची. अभ्यंगस्नानाआधी उटणे लावून घेतल्यानंतर कधी एकदा गरम पाणी अंगावर घेतोय, अशी स्थिती व्हायची. पण आताच्या काळात दिवाळीत थंडीचा लवलेशही नसतो. आता डिसेंबरच्या मध्यावर कधीतरी थंडी सुरू होते आणि लाट आली लाट आली, असे म्हणेपर्यंत ती गायबही होते.
आताचा उन्हाळा अक्षरशः भाजून काढतो. हे बदल का होत आहेत?, सर्वसामान्य माणसाला ते समजू शकत नाहीत का?, त्याची ढोबळ कारणं आपल्या लक्षात येतच नाहीत का?, आणि लक्षात येत असतील, तर त्यात बदल करण्याची आपली जबाबदारी नाही का?, असे अनेक प्रश्न आहेत, जे स्वतःला विचारून त्याची उत्तरे प्रामाणिकपणे द्यायला हवीत. कधी गरज म्हणून तर कधी अपरिहार्यता म्हणून, पण आपण निसर्गाला धक्के देत आहोत.
आता साधं पाहा, मध्यमवर्गीय लोकांच्या प्रत्येकाच्या घरात दोन किंवा त्यापेक्षा अधिक गाड्या आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आपण विसरत चाललो आहोत. ए. सी. वापरण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.
घरगुती आणि त्यापेक्षा व्यावसायिक आस्थापनांमध्ये ए. सी. चा वापर अमर्यादित वाढत आहे. यामुळे निसर्गाच्या ढाच्याला, त्याच्या चालीला, धक्का लावत आहेत आणि त्याचेच पडसाद म्हणून निसर्ग उशिरापर्यंतचा पाऊस, वाढतं ऊन, गायब झालेली थंडी यातून परतफेड करत आहे.
वाढते महामार्ग
• वाढती लोकसंख्या, वाढत्या गरजा यामुळे दळणवळणाची साधने वाढवण्याची गरज आहे. पण, म्हणून एकावेळी किती महामार्ग बांधायचे, यालाही नियोजन हवे. एक महामार्ग बांधताना हजारो हातांनी आपण निसर्ग ओरबाडतो. वर्षानुवर्षांची झाडे तोडली जातात. डोंगरच्या डोंगर कापले जातात.
• निसर्गाला इतके धक्के दिल्यानंतर तो गप्प राहील, अशी अपेक्षाही आपण करतो. शेकडो, हजारो वर्षे एका जागी असलेले डोंगर कापल्यानंतर आसपासच्या भागावर बरेच परिणाम होतात, हे अनुभव वेगवेगळ्या कामांमधून आले आहेत. पण विकासाच्या नावाखाली निसर्गाची लूट होते, त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
पाणी मुरण्याला मर्यादा
• पावसाचे पाणी जमिनीत मुरते. तेच आपली तहान भागवते, पण रस्त्यांची वाढणारी लांबी रुंदी जमीन कमी करत आहे. फार लांब जाण्याचीही गरज नाही. वाढत्या नवीन घर बांधताना, अपार्टमेंट बांधताना आसपासच्या जमिनीवर कोबा घातला जातो, सिमेंट घातले जाते.
• एका बाजूला जमिनीत पाणी मुरण्याचे पर्यायच आपण कमी करत आहोत आणि दुसऱ्या बाजूला उन्हाळा वाढतोय म्हणून ओरडही मारतोय. ग्लोबल वॉर्मिंग नावाच्या महाकाय राक्षसासाठी हे पर्याय छोटे वाटतील कदाचित. पण अशा छोट्या-छोट्या पर्यायांनीच हा राक्षण संपवावा लागेल.
मनोज मुळ्ये
मुख्य उपसंपादक, रत्नागिरी.
हेही वाचा : हवामान बदलताना आपण आजारी का पडतो? जाणून घ्या कारणे आणि त्यावरील उपयांची सविस्तर माहिती
