मुंबई : इंजिनिअरिंग, फार्मसी, कृषी, बी. प्लॅनिंग या अभ्यासक्रमांची पीसीबी आणि पीसीएम तसेच एमबीए अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) आगामी शैक्षणिक वर्षापासून दोनदा घेण्यात येणार आहे.
त्यानुसार यंदा पीसीबी, पीसीएम आणि एमबीए अभ्यासक्रमाची पहिली सीईटी परीक्षा एप्रिल २०२६ मध्ये, तर दुसरी सीईटी परीक्षा मे २०२६ मध्ये घेतली जाणार आहे, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी केली.
राष्ट्रीय स्तरावर आयआयटीसारख्या नामांकित संस्थांमध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणारी जेईई ही प्रवेश परीक्षा दोनवेळा घेतली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना दोनदा संधी उपलब्ध होते.
त्याच धर्तीवर राज्यातील विद्यार्थ्यांनाही दोन संधी या परीक्षेमधून मिळणार आहेत. विद्यार्थ्याला एक प्रवेश परीक्षा देणे बंधनकारक असून, दुसरी प्रवेश परीक्षा ऐच्छिक असेल.
तसेच विद्यार्थ्याने दोन्ही वेळा प्रवेश परीक्षा दिल्यास दोन्हीपैकी ज्या परीक्षेत जास्त गुण असतील ते प्रवेशासाठी गृहीत धरले जातील, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.
अधिक वाचा: महसूल विभागाचे नवे आदेश, आता सात दिवसांत मिळणार शेतरस्ता; जाणून घ्या सविस्तर
