कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (सीसीआय) मार्फत शेतकऱ्यांचा कापूस हमीभावाने खरेदी करण्यासाठी शासकीय खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत; मात्र 'कपास किसान' मोबाईल ॲपद्वारे करण्यात येणारी नोंदणी व अत्यल्प वेळेत होणारे स्लॉट बुकिंग यामुळे मानोरा तालुक्यातील अनेक शेतकरीकापूस विक्रीपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.
वाशिम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यात 'सीसीआय'चे कापूस खरेदी केंद्र मंजूर झाले असले तरी कापूस विक्रीसाठी 'कपास किसान' ॲपद्वारे नोंदणी करणे बंधनकारक आहे. अनेक शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नसून, काही शेतकऱ्यांकडे मोबाईल असला तरी ॲप वापरण्याचे ज्ञान नाही.
त्यातच दर शनिवारी फक्त पाच मिनिटांसाठी स्लॉट बुकिंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. या अल्प कालावधीत व्यापारी स्लॉट बुक करत असताना बहुतांश शेतकरी स्लॉट बुकिंगपासून वंचित राहत आहेत. स्लॉट बुक न झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा कापूस घरातच पडून आहे.
सीसीआयने कापूस खरेदी न केल्यास शेतकरी हमीभाव व भाव फरक यापासूनही वंचित राहू शकतात. त्यामुळे सीसीआयने स्लॉट बुकिंगसाठी दिलेली वेळ वाढवावी, अशी मागणी बाजार समितीचे सभापती डॉ. संजय रोठे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
'सीसीआय'ने स्लॉट बुकिंगची वेळ खूप कमी आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक शेतकरी हमी भावाने कापूस विक्रीपासून वंचित होणार आहेत. त्यामुळे सीसीआयने स्लॉट बुकिंगची वेळ वाढवून द्यावी. अन्यथा शेतकऱ्यांसाठी आंदोलन उभारण्यात येईल. - डॉ. संजय रोठे, सभापती, बाजार समिती मानोरा जि. वाशिम.
रेल्वे विभाग तत्काल तिकीट बुकिंगसाठी जवळपास एक तासाची वेळ उपलब्ध करून देतो; मात्र सीसीआयकडून केवळ पाच मिनिटे स्लॉट बुकिंगसाठी संकेतस्थळ खुले ठेवणे हा शेतकऱ्यांवर अन्याय असल्याची प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. स्लॉट बुकिंगची वेळ तात्काळ वाढविण्यात यावी, अन्यथा तालुक्यात शेतकरी आंदोलन छेडण्यात येईल. - यशवंत इंगळे, शेतकरी नेते.
मोबाइल नसल्याने शेतकऱ्यांची पंचाईत !
कापूस विक्रीसाठी 'कपास किसान' ॲपद्वारे नोंदणी करणे बंधनकारक आहे; मात्र अनेक शेतकऱ्यांकडे ॲण्ड्रॉईड मोबाइल नसल्याने त्यांची पंचाईत झाली आहे.
हेही वाचा : आता सर्पदंशावर होणार अचूक उपचार; स्नेक वेनम किटमुळे कळणार सर्पदंश विषारी की बिनविषारी
