जयेश निरपळ
भारतीय कापूस निगम (सीसीआय) कडून २०२४-२५ या गत हंगामात राज्यातील १२१ शासकीय केंद्रांच्या माध्यमातून तब्बल एकूण १ कोटी ५६ लाख ३९ हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला असून, यापोटी ११ हजार ६६० कोटी रुपयांचे संबंधित शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहे. राज्यात सर्वाधिक २२ लाख क्विंटल कापसाची खरेदी अकोला जिल्ह्यात करण्यात आली आहे.
मागील हंगामात (२०२३-२४) अनेक दिवस खुल्या बाजारात हमीभावाच्या दरम्यान कापसाचा भाव होता. त्यामुळे सीसीआयला कमी कापूस मिळाला होता; मात्र यंदा सुरुवातीपासूनच खुल्या बाजारात कापसाचे भाव कमी असल्याने सीसीआयला चांगला कापूस मिळाला.
कापूस खरेदी केंद्रात कापूस ठेवण्यासाठी जागा नसल्याने मधल्या काळात काही दिवस सीसीआयने कापूस खरेदी बंद केली होती. यावर्षी मात्र २१ मार्चपर्यंत सीसीआयने कापूस खरेदी केली आहे. लांब धाग्याच्या कापसासाठी ७ हजार ५२१ रुपये तर मध्यम धाग्यासाठी ७ हजार १२१ रुपये हमीभाव देण्यात आला. राज्यात विदर्भ, मराठवाडा व खान्देशमध्ये कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते.
त्यामुळे सीसीआयकडून छत्रपती संभाजीनगर व अकोला या दोन झोनमधील १९ जिल्ह्यांतील एकूण १२१ केंद्रांमार्फत कापूस खरेदी करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्ह्यांमध्ये ५४ लाख ४६ हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. यापोटी संबंधित शेतकऱ्यांना ४ हजार १०६ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले.
या विभागामध्ये ६० खरेदी केंद्रांसाठी मराठवाड्यातील ६, खान्देशमधील ३ तर पश्चिम महाराष्ट्रातील एका जिल्ह्याचा समावेश आहे. तर अकोला विभागातील ९ जिल्ह्यांमध्ये ६१ केंद्रांच्या माध्यमातून १ कोटी ९३ हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. यासाठी ७ हजार ५५४ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले.
छत्रपती संभाजीनगर विभागात ५४ लाख ४६ हजार क्विंटल खरेदी
६० 0 केंद्रे छत्रपती संभाजीनगर विभागात आहेत. त्यानुसार विभागात ५४ लाख ४६ हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली.
७८५० रुपये सर्वाधिक मिळाला बाजारभाव
नवीनतम बाजारभावांनुसार, महाराष्ट्रात कापसाचा सरासरी भाव ७ हजार ६७५ रुपये प्रति क्विंटल राहिला. या हंगामात सर्वात कमी बाजारभाव ७ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल तर सर्वाधिक दर ७हजार ८५० रुपये क्विंटल मिळाला आहे. असे असले तरी सर्वाधिक दरवाढीचा अल्प शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे.
सीसीआयची राज्यातील कापूस खरेदी (लाख क्विंटलमध्ये) व रक्कम वाटप (कोटीत)छत्रपती संभाजीनगर विभाग
जिल्हा | कापूस खरेदी | रक्कम |
छत्रपती संभाजीनगर | ७.१८ | ५३१ |
जालना | ८.७२ | ६४५ |
परभणी | १३.७२ | १०१८ |
बीड | ६.७७ | ५०० |
हिंगोली | १.८० | १३४ |
नांदेड | २.९० | २१५ |
जळगाव | ४.७० | ३४७ |
नंदुरबार | २.९९ | २२२ |
धुळे | ३.७४ | २७७ |
अहिल्यानगर | २.९४ | २१७ |
अकोला विभाग
जिल्हा | कापूस खरेदी | रक्कम |
अकोला | २२ | १६७६ |
अमरावती | १३ | ९५० |
बुलढाणा | ८.५ | ६२५ |
चंद्रपूर | १२.५ | ८४६ |
गडचिरोली | ०.२८ | २० |
नागपूर | १.५ | ११३ |
वर्धा | ८.५५ | ६४७ |
वाशिम | १३.६० | १११४ |
यवतमाळ | २१ | १५६३ |
एकूण | १५६.३९ | १६६० |
हेही वाचा : एक एकरात किती रोपे? जाणून घ्या 'या' सूत्राच्या मदतीने शेतातील एकरी रोपांची संख्या