नवी दिल्ली: अमेरिका-इराण संघर्षाचा भडका उडाल्याने भारताच्या चिंतेत भर पडली असून, या युद्धामुळे खाद्यतेल आणि खतांच्या आयातीवर मोठा परिणाम होण्याची भीती उद्योग संघटनांनी व्यक्त केली आहे.
प्रामुख्याने रशिया आणि युक्रेनमधून येणाऱ्या सूर्यफूल तेलाच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे घराघरातील 'किचन बजेट' कोलमडण्याची शक्यता आहे.
इराण संकटामुळे शिपिंग कंपन्यांनी मालवाहतुकीवर २ हजार ते ४ हजार डॉलर्सपर्यंत 'युद्ध अधिभार' लावण्यास सुरुवात केली आहे.
त्यामुळे आयातीचा खर्च वाढला आहे. पश्चिम आशियातील बंदरे बंद झाल्यास कंटेनरची टंचाई निर्माण होईल, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
विद्राव्य खत उद्योग महासंघाचे (एसएफआयए) अध्यक्ष राजीव चक्रवर्ती यांनी सांगितले की, खतांसाठी लागणारा ७६ टक्के गंधक (सल्फर) हा कतार आणि ओमानमधून येतो.
या पुरवठ्यात व्यत्यय आल्यास खरीप हंगामापूर्वी खतांच्या किमती वाढून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडू शकते.
सॉल्व्हंट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे (एसईए) कार्यकारी संचालक बी. व्ही. मेहता यांनी सांगितले की, खाद्यतेलांच्या पुरवठ्यावर अद्याप कोणताही परिणाम झालेला नाही. तथापि, सूर्यफूल तेलाच्या पुरवठ्यात अडथळे येऊ शकतात.
केंद्र सरकारने घेतली तातडीची बैठक
◼️ इराण संकटामुळे भारताच्या आयात-निर्यातीवर होणारा परिणाम रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या वाणिज्य विभागाने सोमवारी निर्यातदार व लॉजिस्टिक सेवादात्यांसोबत तातडीची बैठक घेतली.
◼️ विभागाचे विशेष सचिव सुचिंद्र मिश्रा आणि विदेश व्यापार महासंचालक लव अग्रवाल यांनी बैठकीचे नेतृत्व केले.
◼️ व्यापारी आणि शिपिंग कंपन्यांन येणाऱ्या अडचणी दूर करून मालवाहतूक सुरळीत ठेवण्याचे आश्वासन वाणिज्य मंत्रालयाने दिले असून, परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे.
◼️ आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये कंटेनरची कमतरता भासल्यास कंटेनर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले.
अधिक वाचा: कृषीमाल आयात-निर्यात करणाऱ्या कंटेनरवर आता आपत्कालीन अधिभार; कोणत्या कंटेनरवर किती अधिभार?
