सतीश पाटील
शिरोली : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना दोन चाकी ३ टन ट्रेलरला ७५ हजार, तर ५ टन ट्रेलरला तब्बल १ लाख, तर शेती औजारांना ४० हजारांपासून ७५ हजारांपर्यंत अनुदान मिळणार आहे.
तसेच जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे ट्रेलर आणि शेती औजारांच्या किमती ४० हजार ते १ लाखापेक्षा कमी होणार आहेत. दोनचाकी ३ ते ५ टन ट्रेलर शेतीमधील उत्पादन, खते, औजारे, तसेच इतर साहित्य वाहून नेण्यासाठी वापर होतो.
ट्रेलरची किंमत दोन ते अडीच लाखांपर्यंत असून, शेती मशागतीसठी सिंगल पलटी, डबल पलटी, हायड्रोलिक पलटी, सरी रेझर, रोटाव्हेटर यांसारख्या औजारांचा वापर केला जातो.
या औजारांवर ४० हजारांपासून ७५ हजार रुपये अनुदान उपलब्ध झाले आहे. अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर अर्ज दाखल करणे आवश्यक आहे.
अर्जाची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असल्याने शेतकऱ्यांनी स्वतःचा आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, ७/१२ उतारा, आधार लिंक केलेला मोबाइल क्रमांक व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवणे गरजेचे आहे.
अर्ज मंजूर झाल्यानंतर शासनाकडून थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा केली जाणार आहे. 'पहिले अर्ज पहिले प्राधान्य' या तत्त्वावर लाभदेण्यात येईल. शेतकऱ्यांनी विलंब न करता अर्ज करणे गरजेचे आहे.
ट्रेलर आणि शेती औजारे खरेदीसाठी महाराष्ट्र कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांनी अर्ज दाखल करावयाचा आहे. पहिले अर्ज पहिले प्राधान्य असेल. - बसवराज मास्तोळी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी
शासनाने शेतकऱ्यांसाठी जीएसटी ५ टक्क्यांवर आणला आहे. ट्रेलरला ७५ हजार ते १ लाख अनुदान मिळत आहे. तसेच जीएसटी ७ टक्के कमी झाला आहे. त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे. - दत्तात्रय पाटील, ट्रेलर उद्योजक
महाराष्ट्र कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर अर्ज दाखल करताना शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे अर्ज परत येत आहेत. शासनाने प्रत्येक तालुक्यात अर्ज भरण्यासाठी मदत केंद्र देणे गरजेचे आहे. - संभाजी पाटील, ट्रेलर उद्योजक
राज्य शासनाकडून हार्वेस्टिंगला सर्वांत जास्त अनुदान दिले जाते. शासनाचे अनुदान शेती औजारांनाही मोठ्या प्रमाणात दिले तर त्याचा लाभ शेतकऱ्यांना लवकर मिळेल. - रणजित जाधव, ट्रेलर उद्योजक
अधिक वाचा: Tractor Kharedi : शेतकऱ्यांनो स्वस्तात ट्रॅक्टर खरेदी करण्याची योग्य वेळ आली; असा घ्या फायदा?