Join us

राज्यात 'या' जिल्ह्यांत उसाचे बंपर पिक; यंदा चाळीस लाख टनाने गाळप वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 09:47 IST

Sugarcane Crushing सुरुवातीच्या टप्यात पावसाने दिलेली ओढ, मध्यंतरी जोरदार पाऊस कोसळला आणि नेमके उसाची वाढ होणार त्या सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी झाल्याने उत्पादनावर परिणाम झाला.

राजाराम लोंढेकोल्हापूर : यंदाच्या आगामी साखर हंगामात कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत उसाचे बंपर पीक झाले असून, साखर कारखान्यांच्या अंदाजानुसार किमान ४० लाख टन उसाचे उत्पादन वाढणार आहे.

यामध्ये सांगली जिल्ह्यातच ३० लाख टन ऊस उत्पादन होणार असून, १ कोटी ७लाख टनपेक्षा अधिक ऊस गाळपासाठी येणार आहे. मागील हंगामात उसाचे उत्पादन कमालीचे घटले होते.

सुरुवातीच्या टप्यात पावसाने दिलेली ओढ, मध्यंतरी जोरदार पाऊस कोसळला आणि नेमके उसाची वाढ होणार त्या सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी झाल्याने उत्पादनावर परिणाम झाला. यामुळे हंगामातील गणित बिघडले होते.

कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी जेमतेम १ कोटी २५ लाख ३६ हजार टन, तर सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनी ७७ लाख ३८ हजार टनचे गाळप केले.

दोन्ही जिल्ह्यांतील बहुतांशी कारखान्यांचा हंगाम फेब्रुवारी, मार्च महिन्यातच संपला होता. यंदा मात्र, उसाचे चांगले उत्पादन मिळेल, असा अंदाज आहे. किमान २ कोटी ४२ लाख ५६ हजार टनापर्यंत ऊस गाळपासाठी उपलब्ध होईल असा अंदाज आहे.

सांगलीत आडसाल अधिककोल्हापूर जिल्ह्यातील १ लाख २६ हजार ३४१ हेक्टर पैकी केवळ २६ हजार ३७८ हेक्टर आडसाल ऊस आहे. तर ८५ हजार ७९२ हेक्टर खोडवा क्षेत्र आहे. त्या तुलनेत सांगली जिल्ह्यात १ लाख ३८ हजार ९०४ हेक्टर पैकी ४४ हजार २१४ हेक्टर आडसाल तर ५३ हजार ४३४ हेक्टर खोडवा पीक आहे. आडसालचे क्षेत्र वाढल्याने सांगलीमध्ये तुलनेत उत्पादन वाढणार आहे.

दूधगंगा गळतीचा परिणामदूधगंगा धरणाच्या गळतीचे कारण पुढे करत दूधगंगा व वेदगंगा काठावर उसाचे क्षेत्र कमी करण्याचे आवाहन शासनाने केले होते. परिणामी मागील हंगामातील उसाचे उत्पादन घटले होते.

गेल्या वर्षीच्या तुलनेत उसाच्या क्षेत्रात वाढ झाली असून विशेषतः सांगलीमध्ये आडसाली लागण वाढली आहे. त्यात सध्या पावसाची उघडझाप सुरू आहे, पाऊस असाच राहिला तर उत्पादनात किमान २० टक्के वाढ होऊ शकते. - विजय औताडे, साखर उद्योग अभ्यासक

अधिक वाचा: ऊस लागवड करताय? ८६०३२ पेक्षा जास्त उत्पादन व साखर उतारा देणारी 'ही' जात निवडा

टॅग्स :साखर कारखानेऊसशेतकरीशेतीकोल्हापूरसांगलीलागवड, मशागत