गडहिंग्लज : 'उसाचा काटा.. शेतकऱ्यांचा घाटा' या वृत्तमालिकेच्या माध्यमातून काटामारीवर 'लोकमत'ने रोखठोक भूमिका मांडली. याचे शेतकऱ्यांनी जोरदार समर्थन करत काटामारीचा पर्दाफाश केल्याबद्दल 'लोकमत'चे अभिनंदन केले.
तसेच कारखान्यांनी आपली भूमिका जाहीर करावी, असा आग्रह धरला आहे. या पार्श्वभूमीवर आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका साखर कारखान्याने 'लोकमत'ची भूमिका मान्य असल्याचे सांगत कुठूनही वजन करून आणा, आम्ही स्वीकारू, अशी ग्वाही दिली आहे.
वजन झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या मोबाइलवर त्वरित संदेश पाठविण्याची व्यवस्था करण्याचेही मान्य केले गडहिंग्लज कारखान्याने सकारात्मक पाऊल टाकल्याबद्दल शेतकऱ्यांतून कौतुक होत आहे.
काटामारीतून राज्यातील ऊसकरी शेतकऱ्यांचा खिसा कापला जात असल्याचे चित्र असूनही शासन यावर काहीही करायला तयार नाही. अनेक साखर कारखानदार आमचा काटा बिनचूक असल्याचे छातीठोकपणे सांगतात.
परंतु बाहेरून वजन करून आणलेला ऊस स्वीकारण्यास का-कू करत असल्याचे पहायला मिळते. वाहतूकदारही बाहेर वजन करण्यास उत्सुक नसतात.
शेतकऱ्याच्या आग्रहाखातर बाहेर वजन केलेच तर त्या वाहतूकदाराला त्रास दिल्याचे अनेकांनी 'लोकमत'ला फोन करून सांगितले. 'लोकमत'ने या प्रश्नावर आवाज उठविलाच शिवाय कारखानदारांनी आपली भूमिका जाहीर करण्याचे आवाहन केले होते.
अनेक कारखानदार अजूनही साखरझोपेत
काट्याच्या वे - इंडिकेटरला संगणक जोडू नये, बाहेरून वाहने वजन करून आले तरी ती उतरूण घ्यावीत, वजनाचा संदेश शेतकऱ्यांना त्वरित पाठवा, असे आवाहन 'लोकमत'ने केले होते. परंतु, अजूनतरी अनेक कारखानदारांची साखर झोप पूर्ण झाल्याचे दिसत नाही. याबाबत गडहिंग्लज कारखान्याने आघाडी घेत 'लोकमत'च्या भूमिकेचे स्वागत केले आहे. शेतकऱ्यांनीही आता साखर कारखान्याच्या संचालकांना जाब विचारण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. शेतकरी संघटनांनीही मरगळ झटकून कामाला लागावे.
वे-इंडिकेटरचीच पावती शेतकऱ्यांना
वे-इंडिकेटरला संगणक जोडल्याने मापात पाप कसे करता येते हे 'लोकमत'ने सोदाहरण पटवून दिले. या पार्श्वभूमीवर गडहिंग्लज तालुका कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश पताडे यांनी आमच्या वजनकाट्याच्या वे-इंडिकेटरला संगणक जोडलेला नाही. वे इंडिकेटरचीच पावती शेतकऱ्यांना दिली जाते. उसाच्या वजनात कोणताही फेरफार केला जात नसल्याचे स्पष्ट केले आहे
काटा बिनचूक मग घाबरता का?
शासनाच्या भरारी पथकाने छापा टाकून कारखान्यांचा वजनकाटा तपासल्यानंतर तो निर्दोष असतो. त्याची बातमी प्रसिद्ध व्हावी म्हणून कारखान्याची यंत्रणा धडपडत असते. ते प्रमाणपत्र खरेच किती वस्तुनिष्ठ आहे हा संशोधनाचा विषय आहे. परंतु आता सर्व ऊसकरी शेतकऱ्यांची मागणी असताना कारखानदार तोंड उघडायला तयार नाहीत, आपला काटा चांगला असेल तर भारतातून काय अमेरिकेतून वजन करून या, आम्ही तो घेऊ, असे म्हणण्यास कारखानदारांना काय अडचण आहे, हे न उलगडणारे कोडे आहे.
आप्पासाहेब नलवडे यांनी तालुक्यातीन अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या सहकार्याने हा कारखाना उभारला. स्थापनेपासूनच आमचा काटा चोख आहे. सत्ता कुणाचीही असली तरी आमच्या कारखान्यात काटामारीचे पाप कुणीही करू शकत नाही. 'लोकमत'ने घेतलेल्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. शेतकन्यांनीही स्वतः वजन करून ऊस आणला तर त्या वजनाप्रमाणे ऊस घेण्यास आम्ही तयार आहोत. तसेच वजन झाल्यानंतर त्वरित शेतकऱ्यांना संदेश पाठविण्याची व्यवस्था करू. - प्रकाश पताडे, अध्यक्ष, आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका साखर कारखाना, हरळी
अधिक वाचा: लोकवर्गणीतून काटा उभारूया अन् कारखान्यांच्या काटामारीतील लुटीला पायबंद घालूया