सध्या राज्यातील अनेक भागात अतिवृष्टीचा पाऊस जोरदार हजेरी लावत आहे. परिणामी अनेक ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचल्याने खरीप पिकाला याचा मोठा फटका बसला आहे.
तर काही भागांत तुर पिकावर 'मर रोग' दिसून येत असून कपाशीवर देखील कीड मोठ्या प्रमाणावर आढळतेय. तसेच दाणा भरणी अवस्थेत असलेल्या मक्याची पाने पिवळी पडत आहेत. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
अशा परिस्थितीत जैविक बुरशी 'ट्रायकोडर्मा' शेतकऱ्यांसाठी एक प्रभावी उपाय ठरणारी आहे. ट्रायकोडर्मा ही बुरशी पूर्णतः जैविक असून मातीतील हानिकारक बुरशी, कीड आणि रोग नियंत्रणासाठी उपयुक्त आहे.
'ट्रायकोडर्मा' ने काय फायदे होतात?
• तुरवरील मर रोगावर नियंत्रण : पाणी साचल्यामुळे मुळी कुजतात, त्यामुळे मर रोग होतो. ट्रायकोडर्मा मुळांना संरक्षण देते आणि जमिनीतल्या हानिकारक बुरशींचा नाश करते.
• कपाशीवरील किडींचा बंदोबस्त : ट्रायकोडर्मामुळे मुळांचा विकास चांगला होतो तसेच झाडाची प्रतिकारशक्ती वाढते त्यामुळे किडींचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.
• पिवळसरता थांबते : ट्रायकोडर्मामुळे झाडातील पोषणशक्ती वाढते आणि झाडांची पाने परत हिरवी होण्यास मदत होते.
• मातीचा पोत सुधारतो : ट्रायकोडर्मा बुरशी जमिनीत राहून उपयुक्त सूक्ष्मजिवांच्या वाढीस चालना देते.
• खर्चात बचत होते : ट्रायकोडर्मा बुरशी जैविक असल्याने रासायनिक फवारणीची गरज कमी पडते. परिणामी खर्चात बचत होते.
कसा वापर करावा?
ट्रायकोडर्माचा वापर बीजप्रक्रियेसाठी, मातीच्या चांगल्या दर्जाकरिता शेणखत कुजविण्यासाठी तसेच पिकांच्या वाढीसाठी मूळ कुज रोखण्यासाठी झाडांना आळवणीद्वारे करता येतो. मात्र वापर करण्यापूर्वी स्थानिक कृषी सल्लागारांचा सल्ला आवर्जून घ्यावा.
शेतीकडे जैविक पद्धतीने वळा
राज्यात हवामानातील अस्थिरता वाढत आहे. कधी पाणी जास्त, कधी पाऊस नाही. अशा बदलत्या हवामानात रासायनिक उपाय मर्यादित ठरत आहेत. त्यामुळे जैविक पर्यायांसारखे उपाय जसे की ट्रायकोडर्मा व इतर बुरशी या शाश्वत शेतीसाठी फायदेशीर ठरू शकतात.