कोल्हापूर : गेल्या महिन्याभरात घाऊक बाजारात साखरेने काहीशी उसळी घेतली आहे. प्रतिक्विंटल दोनशे रुपयांची वाढ झाली असून ३७५० रुपयांपर्यंत भाव पोहोचला आहे.
साखर कारखान्यांच्या गळीत हंगामात दरात झालेली वाढ निश्चितच कारखान्यांच्या दृष्टीने दिलासादायक ठरणार आहे. देशात वर्षाला २७० लाख टन साखरेची गरज आहे. यंदा साखरेच्या उत्पादनात घट होईल, असा अंदाज आहे.
जेमतेम देशाच्या गरजेएवढेच उत्पादन होणार असल्याने आगामी काळात साखरेला तेजी राहणार आहे. साखरेला चांगला भाव मिळाला तर शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा जादा दर देण्यास कारखान्यांना मदत होते.
कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी प्रतिटन ३३०० रुपयांपर्यंत पहिली उचल जाहीर केली आहे. साधारणता हंगामाच्या सुरुवातीस साखरेचा दर प्रतिक्विंटल ३७०० रुपये होता.
१५ डिसेंबरला हा दर ३५०० रुपयांपर्यंत खाली आला होता. महिन्याभरात त्यात वाढ झाली असून पुन्हा ३७५० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. ३३०० रुपयांपर्यंत प्रतिटन पहिली उचल कारखान्यांनी जाहीर केली आहे.
असे वाढत गेले साखरेचे घाऊक बाजारात दर (प्रतिक्विंटल)
तारीख | दिल्ली | कानपूर | कोल्हापूर |
६ जानेवारी | ४०७४ | ४०४२ | ३७१७ |
७ जानेवारी | ४०७४ | ४०४२ | ३७१७ |
८ जानेवारी | ४०८४ | ४०५३ | ३७२७ |
९ जानेवारी | ४०८४ | ४०५३ | ३७२७ |
१० जानेवारी | ४०८४ | ४०५३ | ३७२७ |
११ जानेवारी | ४०९५ | ४०६३ | ३७३८ |
१३ जानेवारी | ४११६ | ४०८४ | ३७४८ |
१४ जानेवारी | ४११६ | ४०८४ | ३७४८ |
१५ जानेवारी | ४१३७ | ४१०० | ३७५९ |
साखरेचे दर कमी आहेत म्हणून कारखानदारांनी पहिली उचल कमी दिली आहे. मात्र, सध्या साखरेला चांगला भाव मिळत असल्याने कारखानदारांनी दुसरा हप्ता द्यावा. - धनाजी चुडमुंगे अध्यक्ष, आंदोलन अंकुश संघटना