शिराळा : शिराळा तालुक्यातील १८ गावांत २२ ठिकाणी बिबट्या आल्याची सूचना देणारी अलर्ट सिस्टिम बसविण्यात येणार आहे.
याबाबत वरिष्ठ कार्यालयास याठिकाणाचे अक्षांश व रेखांश याची माहिती पाठविण्यात आली आहे, अशी माहिती वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी यांनी दिली.
त्यांनी सांगितले की, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित ही अलर्ट सिस्टीम कार्यान्वित करण्यात येणार आहे. मानवी वस्तीवर बिबट्याच्या हल्ल्यांची घटना रोखण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला आहे.
उपवनसंरक्षक सागर गवते, सहायक वनसंरक्षक नवनाथ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अनिल वाजे, वनरक्षक दत्तात्रय शिंदे, रजनीकांत दरेकर आदींनी सतत बिबट्याचा वावर असणाऱ्या ठिकाणाची माहिती अक्षांश व रेखांशसह तयार केली आहे.
या प्रणालीमुळे जर बिबट्या मानवी वस्तीजवळ आला तर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे यंत्रणा नागरिकांना अलर्ट करण्याचे काम करुन हल्ल्याच्या घटना कमी होण्यास मदत होणार आहे.
या गावात बसणार अलर्ट सिस्टिम
कणदूर, पुनवत, मांगरूळ, कुसाईवाडी, धसवाडी, सागाव, बिळाशी, बिऊर, उपवळे, कदमवाडी, तडवळे, शिराळा कदमवाडी, रिळे, बेलेवाडी, घागरेवाडी, गिरजवडे, कोकरुड, वाकुर्डे बुद्रूक येथील २२ ठिकाणी अलर्ट सिस्टिम बसविण्यात येणार आहे.
कॅमेऱ्यांद्वारे बिबट्याच्या हालचाली ओळखणार
बिबट्या मानवी वस्तीजवळ आल्यास, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित यंत्रणा आणि अत्याधुनिक सॅटेलाइट कॅमेरे कार्यान्वित केले जाणार आहेत. गावांमध्ये सायरनद्वारे किंवा इतर माध्यमातून तत्काळ अलर्ट दिला जाणार आहे. ज्यामुळे वेळीच लोकांना सावध होता येणार आहे.
अधिक वाचा: मनरेगात आता शेतकऱ्यांच्या मनासारखं झालं; विहीर व शेततळ्यासाठीच्या आर्थिक मर्यादेत भरीव वाढ
