मंचर : पारगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने गाळप केलेल्या उसास एफआरपीनुसार प्रथम अॅडव्हान्स २८०० रुपये प्रति मे. टन वजा जाता उर्वरित २८० रुपये प्रति मे. टनाप्रमाणे देणार आहे.
गाळप केलेल्या ११ लाख ३८ हजार ४९६ मे. टनास रक्कम ३१ कोटी ८७ लाख ७८ हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर लवकरच वर्ग करणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.
मंचर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बेंडे बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष अॅड. प्रदीप वळसे पाटील, संचालक दादाभाऊ पोखरकर, अशोक घुले, कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, सचिव रामनाथ हिंगे, मुख्य लेखापाल राजेश वाकचौरे आदी उपस्थित होते.
बेंडे म्हणाले, कारखान्याचे संस्थापक संचालक दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या संचालक मंडळ सभेत एफआरपीनुसार प्रथम अॅडव्हान्स २८०० प्र. मे. टन वजा जाता उर्वरित २८० रुपयांप्रमाणे रक्कम शेतकऱ्यांच्या लवकरच बैंक खात्यावर वर्ग करण्याचा निर्णय झाला आहे.
दहा तारखेपर्यंत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. प्रथम अॅडव्हान्स जाहीर करताना हंगाम २०२४-२५ करिता अंदाजे १२ टक्के साखर उतारा घेऊन एफआरपी ३१०० रुपये प्र. मे. टन ग्राह्य धरून दुसरा हप्ता ३०० रुपये प्र. मे. टन देता येईल, असे जाहीर केले होते.
तथापि उच्च न्यायालय व शासनाच्या निर्णयानुसार येत असलेल्या एफआरपी रकमेतून प्रथम अॅडव्हान्स २८०० रुपये प्र. मे. टन वजा जाता २८० रुपये प्र. मे. टन फरक येत आहे.
यापूर्वीदेखील प्रत्येक हंगामाची एफआरपीनुसार येणारी फरकाची रक्कम हंगाम संपल्यानंतर अदा केलेली आहे, त्यामुळे एफ.आर.पी. दराबाबत पत्रव्यवहार करून व केलेल्या पत्रव्यवहाराची जाहिरात करून शेतकऱ्यांचा कळवळा असल्याबाबत नौटंकी करू नये, असा टोला बेंडे यांनी लगावला.
गाळप हंगाम २०२४-२५ मध्ये ११ लाख ३८ हजार ४९६ मे. टन ऊस गाळप करून सरासरी १२ टक्के साखर उताऱ्याने १२ लाख ५२ हजार ६०० साखर पोत्यांचे उत्पादन केले.
सहवीजनिर्मिती प्रकल्पाद्वारे ७ कोटी ३३ लाख ६ हजार युनिट उत्पादन करून कारखाना वापर वजा जाता ३ कोटी ६४ लाख ४५ हजार युनिट वीज वितरण कंपनीला निर्यात केली आहे.
तसेच ९० केएलपीडी डिस्टिलरी प्रकल्पामधून आजअखेर १ कोटी १९ लाख १० हजार बल्क लिटर रेक्टिफायर स्पिरिट उत्पादन झाले आहे.
अधिक वाचा: Farmer id : आता घरबसल्या तुमच्या मोबाईलवरच काढा फार्मर आयडी; जाणून घ्या सविस्तर