अवसरी : दत्तात्रयनगर, पारगावतर्फे अवसरी बुद्रुक येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये गाळप होणाऱ्या उसासाठी एफआरपी रक्कम ३२७२.१४ रुपये प्रतिमेट्रिक टन निश्चित केली आहे.
त्यानुसार ३२७३ रुपये प्रतिमेट्रिक टन दर देण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या दोन पंधरवड्यांसाठी अदा केलेल्या प्रथम हप्त्यात ३१०० रुपये प्रतिमेट्रिक टन देण्यात आले आहेत.
या रकमेतील वजाबाकीनंतर उर्वरित १७३ रुपये प्रतिमेट्रिक टनानुसार एकूण ३ कोटी ६७ लाख ७७ हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर बुधवारी (दि. २४) वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना बाळासाहेब बेंडे म्हणाले की, उच्च न्यायालय आणि शासनाच्या निर्णयानुसार मागील हंगामाचा साखर उतारा गृहीत धरून मागील हंगामातील ऊस तोडणी व वाहतूक खर्च वजा करावा लागतो.
त्यानुसार गाळप हंगाम २०२५-२६ साठी देय एफआरपी ३२७२.१४ रुपये प्रतिमेट्रिक टन आहे. कारखान्याने गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये दि. ३० नोव्हेंबरपर्यंत गाळप केलेल्या उसासाठी प्रथम हप्ता ३१०० रुपये प्रतिमेट्रिक टनप्रमाणे दिला होता.
गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये दि. ३० नोव्हेंबरपर्यंत एकूण २ लाख १२ हजार ५८६ रुपये प्रतिमेट्रिक टन ऊस गाळप झाला आहे.
१७३ रुपये प्रतिमेट्रिक टनप्रमाणे एकूण ३ कोटी ६७ लाख ७७ हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर बुधवारी (दि. २४ डिसेंबर) वर्ग करण्यात येणार आहे. यानंतर होणारे पंधरवड्याचे ऊस पेमेंट ३२७३ रुपये प्रतिमेट्रिक टनप्रमाणे वर्ग करण्यात येणार आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला उत्पादित केलेला ऊस भीमाशंकर कारखान्यास गाळपास देऊन सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी केले आहे.
अधिक वाचा: विठ्ठलराव कारखाना दर दहा दिवसाला जमा करणार उसाचे बिल; प्रतिटन किती दिला दर?
