Join us

आणखी ९० दिवस बागा जिवंत ठेवाव्या लागणार; शेतकरी चिंताग्रस्त!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2024 13:30 IST

विहिरींनी तळ गाठल्याने मोसंबीच्या बागांवर पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोसंबीच्या बागा जिवंत ठेवणे एक मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील राणीउंचेगांव परिसरातील विहिरींनी तळ गाठल्याने मोसंबीच्या बागांवर पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोसंबीच्या बागा जिवंत ठेवणे एक मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

विहिरींची पाणीपातळी दिवसेंदिवस कमी होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. तळेगाव व मानेपुरी येथील साठवण तलावांतही कमी पाणी आहे. काही दिवसांत हे तलावही कोरडे पडण्याच्या परिस्थितीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून दुधना नदीचे पात्र कोरडे पडले आहे. त्यामुळे विहिरींच्या पाण्याची आवक कमालीची घटली असून, काही विहिरींचे पाणीही आटले आहे.

राणीउंचेगांव कृषी मंडळातील २२ गावांत ३,४२० हेक्टर क्षेत्र मोसंबी फळबागांचे असल्याची माहिती कृषी विभागातून सांगण्यात आली. विहिरींची पाणीपातळी कमालीची घटल्यामुळे काही शेतकऱ्यांच्या मोसंबीच्या बागा आता सुकू लागल्या आहेत.

शेतीपूरक हा जोडधंदा करेल मालामाल; वराह पालनात मोठ्या संधी

यंदा कोल्हापुरी बंधारेही भरले नाहीत

यंदा दुधना नदीवरील मालीपिंपळगाव व अंतरवाली राठी येथील दोन्ही कोल्हापुरी बंधारे भरलेले नाहीत. त्यामुळे गाढे सावरगाव, अंतरवाली राठी, माली पिंपळगाव, भुतेगाव चापडगाव या गावांतील विहिरींची पाणीपातळी खालावली आहे. तसेच, नदीपात्रातील विहिरीही कोरड्या पडल्या आहेत. पाणी उपलब्ध नसल्याने या भागातील बागा धोक्यात आल्या आहेत. - रवी भुतेकर, शेतकरी

आणखी ९० दिवस बागा जिवंत ठेवाव्या लागणार

यंदा अत्यल्प पाऊस झाल्यामुळे विहिरींची पाणीपातळी खालावली आहे. शेतकऱ्यांना आणखी ९० दिवस बागा जिवंत ठेवाव्या लागणार आहेत. फळबाग पाहणीनुसार अनेक शेतकऱ्यांच्या बागा पाण्याअभावी करपू लागल्या आहेत. त्या जिवंत ठेवणे अवघड झाले आहे. शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचे नियोजन करून बागा जगवाव्यात. - केशव कचकलवाड, कृषी सहायक

टॅग्स :पाणीकपातपीकफलोत्पादनफळेशेतीशेतकरीपाणी टंचाई