राज्यामध्ये खरीप हंगामात जून, जुलै व ऑगस्ट या कालावधीमध्ये शेतकऱ्यांकडून खताची मागणी, खरेदी व प्रत्यक्ष वापर मोठ्या प्रमाणावर होत असतो.
या कालावधीमध्ये निरनिराळ्या कारणामुळे म्हणजेच, मुळातच आवंटन कमी असणे, पाऊस किंवा अतिवृष्टीमुळे रेल्वे वाहतुकीमध्ये अडथळा येणे, रेल्वे रेक वेळेवर उपलब्ध न होणे, खत उत्पादन कारखाने कार्यान्वित नसणे इत्यादीमुळे खताच्या मागणीप्रमाणे पुरवठा करण्यावर विपरीत परिणाम होतो.
खरीप हंगाम जून महिन्यापासून सुरु होत आहे. खरीप हंगामातील पेरणीच्या वेळी व उभ्या पिकांना खताचा दुसरा हप्ता देणे यामुळे युरिया व डिएपी खतांच्या मागणीमध्ये वाढ होत असते.
शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे खताची उपलब्धता होण्यासाठी खरीप हंगाम २०२५ करीता युरिया व डिएपी खताचा संरक्षित साठा करुन ठेवणे आवश्यक आहे.
खरीप हंगाम २०२५ मध्ये राज्यातील शेतकऱ्यांना मागणीप्रमाणे व वेळेवर युरिया व डिएपी खतांचा पुरवठा करण्यासाठी युरिया व डिएपी खतांचा संरक्षित साठा (Buffer Stock) करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
सदर प्रयोजनार्थ दि. विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड, नागपूर, दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड, मुंबई, महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळ, मुंबई आणि महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे यांना खतांचा संरक्षित साठा करण्यास शासनाचे "नोडल एजन्सी" म्हणून नियुक्ती करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
दि. विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड, नागपूर, दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड, मुंबई, महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळ, मुंबई यांना खालीलप्रमाणे खताचा संरक्षित साठा करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
महामंडळाचे नाव | युरिया (१.०० लाख मे. टन) | डिएपी (०.२५ लाख मे. टन) |
महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळ, मुंबई (५०%) | ५०,००० मे. टन | १२,५०० मे. टन |
दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. मार्केटिंग फेडरेशन, मुंबई (३०%) | ३०,००० मे. टन | ७,५०० मे. टन |
दि विदर्भ को-ऑप. मार्केटिंग फेडरेशन लि., नागपूर (२०%) | २०,००० मे. टन | ५,००० मे.टन |
महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे यांनी विनामोबदला संरक्षित खताचा साठा करण्याचे मान्य केल्यामुळे त्यांना प्रायोगिक तत्वावर मंजूर करण्यात आलेल्या एकुण संरक्षित साठ्याच्या (युरिया १ लाख मे.टन व डिएपी ०.२५ लाख मे.टन) प्रत्येकी १०% युरिया व डिएपी खतांचा अतिरिक्त संरक्षित साठा करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
महामंडळाचे नाव | युरिया | डिएपी |
महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे यांना प्रायोगिक तत्वावर विनामोबदला एकुण मंजूरीच्या अतिरिक्त (१०%) | १०,००० मे.टन | २,५०० मे.टन |
अधिक वाचा: राज्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पेमेंटची स्थिती; किती मिळाले तर किती अडकले?