मुंबई : राज्यातील शेतीमधील वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी 'मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते' या नवीन योजनेची घोषणा करण्यात आली आहे.
त्याबरोबरच विधानसभा आमदारांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला असून या रस्त्यांसाठी सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करण्यात येईल.
अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. यावेळी ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले उपस्थित होते.
वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्यासह समितीतील खासदार आणि आमदार उपस्थित होते. शेतापर्यंत रस्ते, वीज आणि पाणी पोहोचले तर शेतकऱ्याला आपला माल बाजारपेठेत घेऊन जाणे शक्य होणार आहे.
प्रथमतः सीमांकन करणे आवश्यक
◼️ यासाठी सरकारने प्राधान्याने या योजनेवर भर दिला असून १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत या योजनेच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने कार्यवाही होणे आवश्यक आहे.
◼️ यासाठी प्रथमतः सीमांकन करणे आवश्यक असून सर्व आमदारांनी याबाबत अतिदक्ष राहून सर्व पाणंद रस्ते नकाशावर आणावेत. हा नकाशा पुढील महिनाभरात गावामध्ये प्रसिद्ध करावा.
◼️ विविध १३ योजनांच्या माध्यमातून सध्या या रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा, असेही बावनकुळे यांनी बैठकीत सांगितले.
अधिक वाचा: Pik Pahani : तुमची ई-पीक पाहणी करायची राहिलीय? काळजी करू नका; आली 'ही' नवीन तारीख